अफगाणिस्तानात हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेला हवाई हद्द वापरू देण्याच्या तयारीत

इस्लामाबाद – अफगाणिस्तानचा ताबा घेण्यासाठी तालिबानला सहाय्य करणार्‍या पाकिस्तानने, आता तालिबानवर हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेला आपली हवाई हद्द वापरू देण्याची तयारी केली आहे. यासाठी पाकिस्तानबरोबर अमेरिका चर्चा करीत असून लवकरच याचा करार पार पडेल, असे अमेरिकेच्या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. अमेरिकन संसद सदस्याच्या हवाल्याने दिलेली ही बातमी पाकिस्तानने नाकारली खरी. पण पाकिस्तानची माध्यमेच आपल्या सरकारकडून दिल्या जाणार्‍या या नकारावर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत. अमेरिकेचे दडपण व डॉलर्सचा लोभ याला बळी पडून पाकिस्तानचे सरकार अमेरिकेशी सौदा करीत असल्याचा आरोप हे पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत.

अफगाणिस्तानात हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेला हवाई हद्द वापरू देण्याच्या तयारीतअफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानकडे लष्करी तळ देण्याची मागणी केली होती. त्याला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ऍब्सुल्युटली नॉट म्हणून बाणेदारपणे उत्तर दिले होते. पण आता अफगाणिस्तानात हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला आपली हवाई हद्द वापरू देण्याची तयारी केली आहे. मात्र याच्या मोबदल्यात पाकिस्तानने अमेरिकेकडे भारताबरोबरील आपले संबंध ‘मॅनेज’ करून देण्याची मागणी केली. यावर अमेरिकेने कोणती प्रतिक्रिया दिली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या बातमीने पाकिस्तानात खळबळ माजविली. कारण काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुन्हा लागू केल्याखेरीज भारताशी चर्चा करणार नाही, असे दावे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ठोकले होते. त्याचवेळी पाकिस्तानचा वापर अमेरिकेला अफगाणिस्तानवरील हल्ल्यासाठी वापरू न देण्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केले होते. या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी तडजोड केली का? असा सवाल पाकिस्तानात उपस्थित करण्यात येत आहे.

अमेरिकेला अफगाणिस्तानातील आयएस व अल कायदा या दहशतवादी संघटनांवर हल्ल्यासाठी आपल्याला पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची परवानगी हवी आहे. सध्या तरी यात तालिबानचा समावेश करण्यात आलेला नाही. पण पुढच्या काळात अमेरिका तालिबानवरही हवाई हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करू शकतो, ही बाब पाकिस्तानचे पत्रकार लक्षात आणून देत आहेत. तसे झाले तर तालिबान पाकिस्तानच्या विरोधात जाईल आणि पाकिस्तानी लष्करावर घणाघाती हल्ले चढविल, अशी चिंता हे पत्रकार व्यक्त करीत आहेत. तालिबानने तशी धमकीच याआधी दिली होती. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे सरकार घेत असलेला हा निर्णय पाकिस्तानवर उलटल्यावाचून राहणार नाही, असा इशारा या पत्रकारांनी दिला आहे.

असे इशारे मिळत असतानाच, पाकिस्तानन अमेरिकी वृत्तवाहिनीची ही बातमी फेटाळली आहे. त्या पाठोपाठ चीन व पाकिस्तानमधील ‘सीपीईसी’ प्रकल्पाला धक्का देण्यासाठी अमेरिका प्रयत्न करीत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सल्लागारांनी केला आहे. याद्वारे पाकिस्तानचे सरकार अमेरिकेबरोबरील हवाई हद्दीबाबतचे सहकार्य दडविण्याच्या तयारीत आहे. कारण अमेरिकेला नकार दिला, तर अमेरिका आपल्या अर्थव्यवस्थेची धुळधाण करील, याची खात्री पाकिस्तानच्या सरकारला पटलेली आहे. मात्र अमेरिकेला हवाई हद्द वापरण्याची परवानगी दिल्याचे उघड झाल्यानंतर, अफगाणिस्तानातील व पाकिस्तानातील तालिबानचे दहशतवादी पाकिस्तानात भयंकर रक्तपात घडवून आणतील. या कचाट्यात पाकिस्तान सापडला असून पुढच्या काळात याचे भयंकर परिणाम पाकिस्तानाला भोगावे लागणार असल्याचे दिसते.

leave a reply