पाकिस्तानचे लष्करप्रमुख व पंतप्रधान एकमेकांना हटविण्याच्या तयारीत

इस्लामाबाद – पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. कुठल्याही क्षणी जनरल बाजवा पंतप्रधान इम्रान खान यांची या पदावरून खाली खेचतील, अशी जोरदार चर्चा पाकिस्तानात सुरू झालेली आहे. त्याचवेळी पंतप्रधान इम्रान खान यांनीही आपल्या विरोधात अशा हालचाली झाल्याच, तर जनरल बाजवा यांना लष्करप्रमुखपदावरून बडतर्फ करण्याचे आदेश देणार असल्याचे दावे केले जातात. लष्करप्रमुख व पंतप्रधान एकमेकांच्या विरोधात अशारितीने तलवारी उपसण्याच्या तयारीत असल्याने, पाकिस्तानात चिंतेचे वातावरण आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख व पंतप्रधान एकमेकांना हटविण्याच्या तयारीतपाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयप्रमुखांच्या नियुक्तीवरून लष्करप्रमुख बजवा व पंतप्रधान इम्रान खान यांच्यामध्ये हा वाद पेटला आहे. जनरल बाजवा यांनी या पदावरून लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना हटवून त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल नदीम अंजूम यांची नियुक्ती केली होती. याच्या आदेशावर पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानात सत्तासंघर्ष पेटला असून यात पंतप्रधान किंवा लष्करप्रमुख यापैकी एकाचा निश्‍चितपणे बळी जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी देखील हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न बनविल्याने आता या दोघांनाही माघार घेणे शक्य नसल्याचा दावा या देशातील वरिष्ठ पत्रकार करीत आहेत.

मात्र पंतप्रधान आणि लष्करप्रमुख आयएसआयच्या प्रमुखांची नियुक्ती करण्याबाबत एकमेकांच्या संपर्कात आहेत, असे सांगून पाकिस्तानचे कायदामंत्री फवाद चौधरी यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान व लष्करप्रमुखांमधला वाद विकोपाला गेल्याच्या दाव्यांचेही फवाद चौधरी यांनी खंडन केले. कायद्यानुसार आयएसआयच्या प्रमुखांची नियुक्ती केली जाईल. याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आहेत, असे सांगून चौधरी यांनी इम्रान खानच याबाबत निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले. तसेच पाकिस्तानच्या मंत्रिमंडळामध्ये यावर विचारविनिमय केला जाईल, अशी माहिती फवाद चौधरी यांनी दिली.

दरम्यान, पाकिस्तानचे विरोधी पक्ष पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात आक्रमक बनले असून हे लष्करप्रमुखांच्या इशार्‍याने घडले आहे, असा दावा काही पत्रकारांनी केला. तर अफगाणिस्तानात फार मोठ्या उलथापालथी होत असताना व भारत काश्मीरच्या प्रश्‍नावर आक्रमक बनलेला असताना, पाकिस्तानसाठी हा अंतर्गत सत्तासंघर्ष घातक ठरेल, अशी चिंता काही पत्रकारांनी व्यक्त केली आहे.

leave a reply