पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला व्हिसा नाकारला

श्रीनगर – भारताने पाकिस्तानमधील भारतीय मिशनचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केलेले वरिष्ठ राजनैतिक अधिकारी जयंत खोब्रागडे यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. वरिष्ठ राजनैतिक अधिकारी खोब्रागडे यांची नियुक्ती आपल्याला मान्य नसल्याचे पाकिस्तानी म्हटले आहे. भारताने यानंतर कोणाची नियुक्ती करावी हे ठरवण्याचा अधिकार पाकिस्तानला नाही, असे स्पष्टपणे बजावले आहे. भारतही पाकिस्तानच्या अधिकार्‍यांविरोधात अशीच कारवाई करू शकतो असे संकेत मिळत आहेत.

व्हिसा नाकारला

भारतातील आपल्या उच्चायुक्तालयाचा वापर पाकिस्तान हेरगिरीसाठी करीत असल्याचे जून महिन्यात समोर आले होते त्यानंतर भारताने कठोर निर्णय घेत पाकिस्तानला दिल्लीतील उच्चयुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताला आपले ५० टक्के कर्मचारी पाकिस्तानातील दूतावासामधून कमी करण्यास सांगितले होते. याआधी पाकिस्तानात भारताच्या अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले होते. भारताच्या दोन अधिकाऱ्यांना खोटे आरोप लावत ताब्यात घेण्यात आले होते. मात्र भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर त्यांना सोडून देण्यात आले.

आता पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्याला व्हिसा नाकारला आहे. १९९५च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असलेले जयंत खोब्रागडे हे सध्या अणुऊर्जा विभागाचे संयुक्त सचिव आहेत. त्याआधी खोब्रागडे हे किरगिझ रिपब्लिकमध्ये राजदूत म्हणून तैनात होते. तसेच यापूर्वी त्यांनी रशिया, स्पेन आणि कझाकिस्तानमध्ये राजनैतिक अधिकारी म्हणून काम केले आहे. पाकिस्तानने खोब्रागडे यांच्या वरिष्ठतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. ५० टक्के कर्मचारी कापतीनंतर भारतीय उच्चयुक्तलयात इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नियुक्तीची आवश्यकता नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

यानंतर भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती करायची हे पाकिस्तानाने सांगू नये असे भारताने स्पष्ट बजावले आहे. तसेच भारतही पाकिस्तानला जशाच तशीच कारवाई करून उत्तर देईल, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply