अफगाणिस्तानात भयंकर रक्तपात घडविणारे तालिबानी सर्वसामान्य नागरिक असल्याचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा

इस्लामाबाद – अफगाणिस्तानात तालिबान करीत असलेल्या कारवायांना आम्ही जबाबदार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तालिबान घडवित असलेल्या रक्तपाताची जबाबदारी नाकारली. मात्र तालिबान दहशतवादी संघटना नसून ते सर्वसामान्य नागरिक असल्याचे प्रशस्तीपत्रक पंतप्रधान इम्रान?खान यांनी दिले. त्याच्या बरोबरीने अमेरिकेने अफगाणिस्तानात हाहाकार माजविल्याचे सांगून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीचे खापर अमेरिकेवर फोडले आहे.

अफगाणिस्तानात भयंकर रक्तपात घडविणारे तालिबानी सर्वसामान्य नागरिक असल्याचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावाअफगाणिस्तानातील संघर्षात तालिबानची सरशी होत असल्याच्या बातम्या आल्यानंतर, पाकिस्तानात तालिबानच्या विजयावर जल्लोष केला जात आहे. मात्र तालिबानला आपला पाठिंबा नाही, असे दाखवून अफगाणिस्तानातील हिंसाचाराला पाकिस्तान जबाबदार नाही, असे चित्र या देशाकडून उभे केले जाते. पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही अशीच भूमिका स्वीकारली. मात्र तालिबान दहशतवादी संघटना नाही, उलट ते सर्वसामान्य नागरिक असल्याचे अंगावर उलटणारे दावे इम्रान खान यांनी केले.

तालिबानचा सहभाग असलेले सर्वसामावेशक सरकार हाच अफगाणिस्तानची समस्या सोडविण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे इम्रान खान म्हणाले. वेगळ्या शब्दात तालिबानचे वर्चस्व असलेले सरकार प्रस्थापित झाल्याखेरीज अफगाणिस्तानची समस्या सुटणार नाही, असे इम्रान?खान यांना सांगायचे आहे. मात्र अफगाणिस्तानची समस्या राजकीय वाटाघाटींनीच सुटेल, असे सुचविणार्‍या इम्रान?खान यांनी तालिबानला हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केलेले नाही. तसेच तालिबानच्या न मानता येण्याजोग्या मागण्या हीच या राजकीय वाटाघाटींच्या आड येणारी सर्वात मोठी समस्या आहे, याकडे पाकिस्तानचे पंतप्रधान लक्ष द्यायला तयार नाहीत.

अफगाणिस्तानात भयंकर रक्तपात घडविणारे तालिबानी सर्वसामान्य नागरिक असल्याचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावाअफगाणिस्तानात अमेरिकेच्या धोरणांमुळे हाहाकार माजला, असा ठपका ठेवून पंतप्रधान इम्रान खान आपल्या देशाच्या दहशतवादी धोरणांचा बचाव करीत आहेत. पण आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तान तालिबानला करीत असलेल्या सहाय्याची गंभीर दखल घेतली जात असल्याचे दिसते. विशेषतः अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी, मुत्सद्दी व विश्‍लेषक पाकिस्तानच्या विश्‍वासघातामुळेच तालिबान अफगाणिस्तानात इतके यश मिळवू शकल्याचा आरोप करीत आहेत. यामुळेच अमेरिकेला अफगाणिस्तानात अपयश मिळाले आणि त्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे, अशी मागणी अमेरिकन लोकप्रतिनिधीही करीत आहेत.

सध्या अमेरिका अंतर्गत समस्यांमध्ये गुंतलेली आहे व परराष्ट्र धोरणाकडे बायडेन प्रशासनाचे असायला हवे तितके लक्ष राहिलेले नाही. म्हणूनच आत्तापर्यंत पाकिस्तानचा बचाव झाला, असे पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन राजकीय कार्यकर्त्यांनी एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. तालिबानला संपूर्ण सहाय्य करून पाकिस्तानने आपले धोरण चीनच्या बाजूने वळविले आहे. आज नाहीतर उद्या, पाकिस्तानला याची जबर किंमत मोजण्यास अमेरिका भाग पाडेल, अशी चिंता या पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन राजकीय कार्यकर्त्याने व्यक्त केली. त्याचवेळी पाकिस्तान तालिबानसारख्या कट्टर संघटनेला करीत असलेल्या सहाय्यावर ‘पश्तून तहफ्फूज मुव्हमेंट’चे (पीटीएम) नेते मंझूर पश्तीन यांनी सडकून टीका केली. तर तालिबानबरोबर सहकार्य करण्याच्या निर्णयाचे परिणाम पाकिस्तानात दिसू लागले असून महिलांवरील कट्टरपंथियांच्या अत्याचारात व गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची नोंद पाकिस्तानातील पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.

leave a reply