पाकिस्तान अजूनही तालिबानला मदत करीत आहे

- अमेरिकेच्या पेंटॅगॉनचा अहवाल

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील शांती प्रक्रियेला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. तसेच यासाठी आपण सक्रिय भूमिका पार पडल्याचे सांगून पाकिस्तान आपली पाठ थोपटून घेत आहे. पण प्रत्यक्षात अजूनही अफगाणिस्तानात रक्तपात माजविणाऱ्या तालिबानला पाकिस्तान सहकार्य करीत आहे, अशी माहिती देणारा अहवाल अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने प्रसिद्ध केला. अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांती करारानंतर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील पाकिस्तानची भूमिका दहशतवादाला पाठिंबा देण्याचीच असून भारताचा अफगाणिस्तानातील प्रभाव कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम पाकिस्तान अफगाणिस्तानात राबवीत असल्याचे दिसते.

या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचा हा सुरक्षाविषयक अहवाल पेंटॅगॉनने प्रसिद्ध केला. यात अफगाणिस्तानातील परिस्थितीची माहिती देण्यात आली असून पाकिस्तान अजूनही अफगाणिस्तानातील तालिबानला सहाय्य करीत आहे, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. विशेषतः तालिबानमधील सर्वात प्रबळ मानल्या जाणाऱ्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानचे पहिल्यासारखेच सहाय्य सुरू आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेने तालिबान बरोबर शांतीकरार केल्यानंतरही पाकिस्तान तालिबान वरील आपला प्रभाव अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वापरायला तयार नाही.

उलट अफगाणी सरकार आणि भारताच्या अफगाणिस्तानातील हितसंबंधांच्या विरोधात तालिबानचा वापर करण्यासाठी पाकिस्तान शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे पेंटॅगॉनच्या या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारताने इथल्या विकास प्रकल्पांमध्ये दोन अब्ज डॉलर्सहून अधिक मोठी गुंतवणूक केली आहे. अफगाणी संसदेची इमारत ही भारताने उभी करून दिली आहे. अफगाणिस्तानातील भारताच्या या सकारात्मक योगदानाची जगभरात प्रशंसा होत असून यामुळे भारताचा अफगाणिस्तानातील प्रभाव वाढला आहे. अफगाणिस्तानातील लोकशाही व भारताचा प्रभाव या गोष्टी आपल्यासाठी घातक असल्याचा समज पाकिस्तानने करून घेतला आहे. म्हणूनच पाकिस्तान अफगाणिस्तानातील भारतीय हितसंबंधांना सतत लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहे व त्यासाठी तालिबानचा वापर पाकिस्तानने केला होता. याआधी अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासांवर झालेले दहशतवादी हल्ले, अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण यामागे तालिबानचा हक्कानी नेटवर्क हा गट असल्याचे उघड झाले होते.

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांकडून हे सारे घडवीत असल्याचे स्पष्ट झाले होते. अमेरिकेने तालिबान बरोबर शांतीकरार करून अफगाणिस्तानातील शांती प्रक्रियेला वेग दिल्यानंतरही पाकिस्तानच्या या विघातक भूमिकेत बदल झालेला नाही. पेंटॅगॉनच्या अहवालामुळे ही बाब पुन्हा एकदा जगजाहीर झाली आहे. वरकरणी पाकिस्तान अफगाणिस्तानातील शांती प्रक्रियेचे समर्थन करीत असला तरी प्रत्यक्षात हा देश अफगाणिस्तानात अशांती व अस्थैर्य माजविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते.

भारताने थेट तालिबानशी चर्चा करून अफगाणिस्तानातील शांती प्रक्रियेत अधिक महत्त्वाची भूमिका बजावावी, असा सल्ला अमेरिकेचे विशेष दूत झल्मे खलिलझाद यांनी दिला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण व मध्य आशिया विभागाच्या उपमंत्री अॅलिस वेल्स यांनीही भारताला तालिबानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला असून हा सल्ला मानायचा की नाही ते भारताने ठरवायचे आहे, असे म्हटले आहे. मात्र तालिबान वरील पाकिस्तानचा प्रभाव लक्षात घेता भारताची तालिबान बरोबरील चर्चा कितपत यशस्वी ठरेल, असा नवा प्रश्न पेंटॅगॉनच्या अहवालामुळे उपस्थित झाला आहे.

leave a reply