काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानी लष्कराचा बेछूट गोळीबार

- भारताचे सणसणीत प्रत्युत्तर

नवी दिल्ली – उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझच्या खोर्‍यात भारतीय आणि पाकिस्तानी लष्करात जबरदस्त चकमक सुरू आहे. दोन्हीकडच्या लष्करांकडून सीमेवरील चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी सलग गोळीबार सुरू आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या जवानांकडून मॉर्टर्सचे हल्ले देखील सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भारताच्या नियंत्रण रेषेवरील नानी पोस्ट’ला पाकिस्तानी जवान लक्ष्य करीत आहेत. तर प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांनी गोळीबार आणि मॉर्टर्सचा भडीमार करुन पाकिस्तानची लोसार पोस्ट दणाणून टाकली आहे.

गोळीबार

गुरेझ प्रमाणे इतरही सीमारेषेवर पाकिस्तानी जवानांनी हल्ले सुरू केले आहेत. सीमेवरील गोळीबाराच्या आडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न देखील सुरू असल्याची माहिती सुरू आहे. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले असून सीमासुरक्षा दल, लष्कर तसेच जम्मू-काश्मीरची पोलिस यंत्रणा या ठिकाणी अलर्टवर आहेत. सीमेवरील तणावाचा शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी राजौरी येथील गोळीबारात भारतीय लष्कराचा सैनिक अनिश टी. हे शहीद झाले आहेत.

दरम्यान, लडाखच्या सीमेवर चीनच्या लष्करी आक्रमकता सुरू असताना या संधीचा फायदा उचलून पाकिस्तानने देखील भारताच्या नियंत्रण रेषेवर हल्ले सुरू करावे, असे पाकिस्तानातील माजी लष्करी अधिकारी सुचवित आहेत. मात्र भारत-चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना पाकिस्तानने त्यापासून दूर रहावे. या युद्धात उतरणे पाकिस्तानसाठी घातक ठरेल, असा सल्ला काही समंजस पाकिस्तानी पत्रकार विश्लेषक देत आहेत.

leave a reply