अफगाणिस्तानात तालिबानसह लढणार्‍या पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍याला अटक

काबुल – पाकिस्तानचा तालिबानशी संबंध जोडू नका, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. मात्र तालिबानच्या बाजूने लढणार्‍या पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍याला ताब्यात घेऊन, अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. अफगाणिस्तानात दाखल होण्याआधी या पाकिस्तानी अधिकार्‍याने आपण जम्मू व काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतो, अशी कबुली दिली. त्याच्या या कबुलीजबाबामुळे अफगाणिस्तानसह भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तान अजूनही गुंतलेला आहे, हा आरोप नव्याने सिद्ध होत आहे.

तालिबानसह लढणार्‍याअफगाणिस्तानच्या राष्ट्रीय गुप्तचर आणि सुरक्षा विभागाने मंगळवारी पाकिस्तान सीमेजवळच्या पाकतिया प्रांतात कारवाई करून तालिबानचे तळ उद्ध्वस्त केले. येथील दंड पतान जिल्ह्यातील कारवाईत अफगाणी गुप्तचर यंत्रणांनी तालिबानच्या दहशतवाद्याला अटक केली. अफगाणी सुरक्षा यंत्रणेने कसून चौकशी केल्यानंतर हा दहशतवादी पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी असल्याचे उघड झाले. ‘अझिम अख्तर’ असे या पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍याचे नाव असून त्याच्याकडे असलेल्या आयकार्डमुळे त्याची ओळख पटली. अझिम अख्तरचे वडिल आणि काका देखील पाकिस्तानी लष्करात होते, अशी माहिती अफगाणी वृत्तसंस्थेने दिली. पाकिस्तानच्या लष्करात दीड वर्षाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर पेशावर आणि तेथून खैबर-पख्तूनख्वा येथील पारचिनारच्या तळावर त्याला धाडण्यात आले होते. या लष्करी तळावर तालिबानचे दहशतवादी देखील होते, अशी कबुली अझिमने माध्यमांसमोर दिली.

तालिबानसह लढणार्‍याअफगाणिस्तानातील संघर्षात तालिबानच्या बाजूने संघर्ष करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात दहशतवाद माजविण्याचे आदेश येथेच आपल्याला मिळाले होते. तसेच या संघर्षात पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी व जवान आधीच तालिबानसोबत लढत असल्याची माहिती वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी दिल्याचे अझिमने माध्यमांसमोर सांगितले. पण अफगाणिस्तानच्या कुठल्या भागात पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी संघर्ष करीत आहेत, हे कळू शकलेले नाही.

अफगाणिस्तानातील अस्थैर्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्तानच तालिबान व इतर दहशतवादी संघटनांना तळ पुरवून सहाय्य करीत असल्याचा आरोप अफगाणी सुरक्षा यंत्रणा करीत आहे. तर अफगाणिस्तानचे हे आरोप पाकिस्तान फेटाळत आहे. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना, पाकिस्तानचा तालिबानशी संबंध जोडू नका, असे म्हटले होते. तसेच आपण तालिबानचे वकिलपत्र घेतलेले नाही, असे सांगून कुरेशी यांनी पाकिस्तानवरील आरोपांना बगल दिली होती.

मात्र अफगाणी सुरक्षा यंत्रणेने तालिबानसोबत लढणार्‍या पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍याला माध्यमांसमोर उभा करून पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. हे आरोप नाकारणे पाकिस्तानसाठी अवघड जाईल. शिवाय यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवादाचे मूळ पाकिस्तानातच आहे, हा भारत व अफगाणिस्तानचा आरोप यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. यावेळी त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात.

leave a reply