पाकिस्तानचे लढाऊ विमान कोसळले

इस्लामाबाद – मंगळवारी सकाळी पाकिस्तानच्या वायुसेनेचे ‘जेएफ-१७’ लढाऊ विमान अटक येथे कोसळले. या दुर्घटनेतून वैमानिक बचावल्याचे पाकिस्तानी वायुसेना व लष्कराने स्पष्ट केले. पण दुर्घटनाग्रस्त विमानाची माहिती देण्याचे तसेच घटनास्थळापासून माध्यमांना दूर ठेवून लष्कर याबाबत लपवाछपवी करीत असल्याचा आरोप काही पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. ‘जेएफ-१७’ हे चिनी बनावटीचे प्रगत विमान असल्याचा दावा चीन आणि पाकिस्तान करीत आहे.

लढाऊ विमान

वायुसेनेच्या प्रशिक्षण मोहिमेवर असताना सदर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे पाकिस्तानच्या वायुसेनेने म्हटले आहे. इस्लामाबादच्या दक्षिणेकडे असलेल्या अटक येथील पिंडीघाबजवळ ही दुर्घटना घडली. पाकिस्तानच्या वायुसेनेने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण दुर्घटनाग्रस्त विमानाचा प्रकार, विमानाचे तपशील देण्याचे पाकिस्तानी वायुसेना तसेच लष्कराने टाळले आहे. पाकिस्तानच्या लष्कराने घटनास्थळाचा ताबा घेतला असून माध्यमे तसेच स्थानिकांना शंभर मीटर दूर अंतरावर ठेवले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर जनतेपासून काही तरी लपवित असल्याचा दावा पाकिस्तानी वृत्तवाहिन्या करू लागल्या आहेत.

पाकिस्तानातील काही लष्करी विश्लेषकांनी घटनास्थळावरील फोटोजचा हवाला देऊन सदर विमान जेएफ-१७ असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चिनी बनावटीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे जगजाहीर होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर ही काळजी घेत असल्याचेही बोलले जात आहे. जानेवारी महिन्यापासून पाकिस्तानी वायुसेनेचे विमान कोसळण्याची ही पाचवी घटना ठरते. तर जेएफ-१७ विमान दुर्घटनाग्रस्त होण्याची ही दुसरी घटना असल्याचे पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांचे म्हणणे आहे. या वर्षभरात लढाऊ विमानांच्या दुर्घटनेत पाकिस्तानने तीन वैमानिक गमावले आहेत.

‘जेएफ-१७’ ही चिनी बनावटीची ‘फोर्थ जनरेशन’ विमाने असल्याचा दावा पाकिस्तान आणि चीन करीत आहे. पाकिस्तानातील काही लष्करी विश्लेषकांनी सदर विमान ‘सिक्स्थ जनरेशन’ विमान असल्याचे सांगून स्वत:चे हसे करुन घेतले होते. बुद्धीसंपदेच्या चोरीसाठी प्रसिद्ध असलेल्या चीनने अमेरिकेच्या एफ-१६ विमानाची नक्कल मारुन जेफ-१७ची निर्मिती केल्याचा आरोप याआधी करण्यात आला होता. पण ‘रिव्हर्स इंजिनिअरींग’मुळे अनेकदा अडचणीत सापडलेल्या चीनच्या या विमानातही दोष असल्याचे उघड झाले होते.

या विमानांच्या अद्ययावतीकरणासाठी पाकिस्तानने चीनला डावलून रशियाकडून इंजिनची मागणीही केली होती. पण भारताने आक्षेप घेतल्यानंतर रशियाने पाकिस्तानला सदर इंजिन पुरविण्याचे नाकारले होते. भारताच्या रफायल विमानांना आपली जेएफ-१७ तोडीस तोड उत्तर देतील, असेही काही पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले होते. पण कुठल्याही संघर्षाचा अनुभव नसलेल्या जेएफ-१७’ची तुलना अफगाणिस्तान, सिरिया, लिबियामधील संघर्षात वापरल्या गेलेल्या रफायलशी करणे योग्य ठरणार नसल्याची आठवण पाकिस्तानातील काही लष्करी विश्लेषकांनी काही आठवड्यांपूर्वी करुन दिली होती.

leave a reply