पुलवामाचा दहशतवादी हल्ला इम्रान सरकारनेच घडविल्याची पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली

इस्लामाबाद – ४० भारतीय सैनिकांचे बळी घेणारा पुलवामातील भ्याड दहशतवादी हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला मिळालेले फार मोठे यश होते. ‘आम्ही भारताच्या घरात घुसून हल्ला घडविला’, अशी धडधडीत कबुली पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानी संसदेत दिली. यामुळे पुलवामातील घातपात भारतानेच घडवून आणल्याचे बेशरमपणे आरोप करणार्‍या पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारचे पितळ उघड पडले आहे आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असे भारतीय माध्यमे, विश्लेषक व पत्रकार जगजाहीर करीत आहेत.

दहशतवादी हल्ला

‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ’ (पीएमएल-एन) या विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते अयाझ सादिक यांनी बुधवारी पाकिस्तानी संसदेत काही महत्त्वपूर्ण खुलासे केले होते. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्याचा निर्णय पाकिस्तानचे लष्कर व सरकारने भीतीपोटी घेतला होता, असे सादिक म्हणाले. इतकेच नाही तर, भारताच्या हल्ल्याच्या भीतीने लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचे पाय कापत होते व ते घामाघूम झाले होते, असे सांगून सादिक यांनी पाकिस्तानात खळबळ माजविली. विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय घेतला नाही तर रात्री ९ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला चढविल, असे सांगून परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी विरोधी पक्षनेत्यांना अभिनंदन यांची सुटका करण्याच्या निर्णयाला समर्थन देण्याची विनंती केली होती, ही माहिती देखील सादिक यांनी आपल्या भाषणात दिली. सादिक यांच्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि ‘पीएमएल-एन’चे नेते ख्वाजा असिफ यांनीही संसदेत सादिक यांच्या दाव्याला दुजोरा दिला.

दहशतवादी हल्ला

भारतीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरल्यानंतर पाकिस्तानचे सरकार अडचणीत आल्याचे दिसत होते. म्हणूनच आपल्या सरकारचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तानी संसदेत फार मोठी कबुली देऊन टाकली. पुलवामातील दहशतवादी हल्ला हा इम्रान खान यांच्या सरकारचा फार मोठा पराक्रम होता. ‘आम्ही भारताच्या घरात घुसून हल्ला चढविला आणि या यशाचे श्रेय इम्रान खान यांच्या सरकारबरोबर विरोधी पक्षालाही जाते’, अशा फुशारक्या फवाद चौधरी यांनी मारल्या. संसद सदस्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आपण घोडचूक करून बसलो आहोत, याची जाणीव चौधरी यांना झाली. त्यावर सारवासारव करण्यासाठी चौधरी यांनी पुलवामानंतरच्या हवाई चकमकीत पाकिस्तानने मिळविलेल्या तथाकथित यशाचा दाखला देऊन आपण बोलत असल्याचा आव आणला. मात्र त्याआधी स्पष्ट शब्दात त्यांनी दिलेली कबुली भारतीय माध्यमांनी उचलून धरली असून पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचा घणाघाती आरोप सुरू केला आहे. पुढच्या काळात ‘एफएटीएफ’च्या ब्लॅकलिस्टसाठी तयार रहा, असा संदेश भारतीय सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानला देत आहेत.

दहशतवादी कारवायांच्या मागे असलेली पाकिस्तानची भूमिका सार्‍या जगाला ठाऊक झालेली आहे. याबाबतीत पाकिस्तानने कितीही नकारघंटा वाजविली तरी, सत्य झाकले जाऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेल्यांना सर्वाधिक प्रमाणात आश्रय पाकिस्तानातच दिला जातो. त्यामुळे यापुढे पाकिस्तानने आपण दहशतवादाचे बळी असल्याचा बनाव करू नये, अशी जळजळीत टीका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. तर माजी वायुसेनाप्रमुख बी. एस. धनोआ यांनी अभिनंदनची सुटका करण्याची तयारी भारतीय संरक्षणदलांनी केली होती. वायुसेना, लष्कर व नौदल पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या तयारी होते. सीमेनजिक असलेली पाकिस्तानी लष्कराच्या आघाड्या उद्‍ध्वस्त करण्याची तयारी भारतीय वायुसेनेने केली होती व त्याची पाकिस्तानलाही पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्यांनी अभिनंदनची सुटका केली, असे धनोआ यांनी म्हटले आहे.

leave a reply