भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराची चौकी उद्‍ध्वस्त

श्रीनगर – काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील संघर्षबंदीच्या उल्लंघनाला भारताच्या सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराची चौकी उद्‍ध्वस्त केली. भारतीय सैनिकांच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी जवानांनी ही चौकी सोडून पळ काढल्याची माहिती समोर येत आहे. पण पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्कराच्या या कारवाईत झालेले नुकसान माध्यमांसमोर उघड केलेले नाही. तर भारताने नियंत्रण रेषेवरील आपल्या गस्तीत वाढ केली आहे.

पाकिस्तानी लष्कराची चौकी

पाकिस्तानच्या लष्कराने काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील हल्ल्यांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. नियंत्रण रेषेवरील राजौरी, पुंछ या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वेळा संघर्षबंदीचे उलंघन झाले आहे. रविवार संध्याकाळपासून पुंछ जिल्ह्यातील देग्वार सेक्टर तसेच खरी करमाडा या भागात पाकिस्तानी लष्कराने १२० एमएम मॉर्टर्सचे हल्ले चढविले. तर काही ठिकाणी १५० एमएम मॉर्टर्सचे हल्ले झाल्याचा दावाही केला जातो. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाली नसून भारतीय सैनिकांनी स्थानिक गावकर्‍यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या या संघर्षबंदीला उत्तर देताना भारतीय सैनिकांनी रविवारी रात्री केलेल्या कारवाईत पाकिस्तानी जवानांची सुरक्षा चौकी आगीत पेटल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय सैनिकांनी केलेल्या मार्‍यात पाकिस्तानी लष्कराची ही पोस्ट पूर्णपणे नष्ट झाली. भारतीय सैनिकांच्या या कारवाईनंतर पाकिस्तानच्या जवानांनी जीवाच्या भयाने पोस्ट सोडून पलायन केल्याचा दावा केला जातो. यानंतर सदर पाकिस्तानी पोस्टच्या दिशेने हल्ले झालेले नाहीत.

गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराने काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली असून भारतीय सैनिकांकडूनही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. गेल्या महिन्याभराच्या या संघर्षात पाकिस्तानला मोठी जीवितहानी सोसावी लागल्याचा दावा केला जातो. पण पाकिस्तानी लष्कर जीवितहानी उघड करीत नसल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सीमेवरील संघर्षात ठार झालेल्या पाकिस्तानी जवानांचे कुटुंबिय सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध करुन भारताबरोबरच्या संघर्षात पाकिस्तानने जवान गमाविल्याचा दाखला देत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराची नाचक्की झाली आहे.

leave a reply