अफगाण-पाकिस्तान सीमेवर सहा महिन्यात ४० पाकिस्तानी जवान ठार

इस्लामाबाद/काबुल – शनिवारी ‘तेहरिक-ए-तालिबान’ने उत्तर वझिरिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात दोन पाकिस्तानी जवानांचा बळी गेला आहे. अफगाण-पाकिस्तान सीमेवर ‘तेहरिक-ए-तालिबान’ ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा प्रबळ होत असल्याचे संकेत या हल्ल्यातून मिळाले आहेत. गेल्या सहा महिन्यात या दहशतवादी संघटनेने तब्बल ४० पाकिस्तानी जवानांना मारले असून, दररोज पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढविले जातील, अशी धमकीही दिली आहे.

अफगाण-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४० पाकिस्तानी जवानांचा बळीपाकिस्तानी लष्कराला उत्तर वझिरिस्तानच्या मिरानशाह भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्यासाठी लष्कराने शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी पथकावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन पाकिस्तानी जवान मारले गेले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी पाकिस्तानी लष्कराने मोहीम सुरू ठेवल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

अफगाणिस्तान सरकार व तालिबानमध्ये शांतीचर्चा सुरु झाल्यानंतर पाकिस्तानी लष्करावर झालेला हा पहिला मोठा हल्ला ठरला आहे. पाकिस्तानी लष्कराने यापूर्वी २०१४ साली वझिरिस्तानमध्ये मोठी मोहीम राबवून ‘तेहरिक-ए-तालिबान’सह इतर दहशतवादी संघटनांना निष्क्रिय केल्याचा दावा केला होता. मात्र या संघटनांनी आपले तळ अफगाणिस्तानात हलवून पुन्हा सक्रिय होण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानी लष्करावर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांनी या हालचालींना अधिक वेग आल्याचे दिसत आहे.

अफगाण-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४० पाकिस्तानी जवानांचा बळीअफगाण सरकार व तालिबानमध्ये शांतीकरार झाल्यास अफगाणिस्तान मधील तळ गमवावे लागतील, अशी भीती ‘तेहरिक-ए-तालिबान’ला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्करावर हल्ले करून उत्तर वझिरिस्तानात पुन्हा एकदा बस्तान बसविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी ‘तेहरिक-ए-तालिबान’ने जुलै महिन्यात अफगाण-पाकिस्तान सीमेवर सक्रिय असणाऱ्या काही दहशतवादी गटांना एकत्र आणून नवी आघाडीही तयार केली आहे. या आघाडीच्या मदतीने ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानी लष्करावर आक्रमक हल्ले चढविण्यास सुरुवात केली असून त्याला यश मिळत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यापासून ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानी लष्कराच्या किमान ४० जवानांचा बळी घेतला आहे. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानी लष्कराला मदत करणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात येत असून १०० हुन अधिकजणांची हत्या केल्याचे सांगण्यात येते.

‘तेहरिक-ए-तालिबान’ने काही दिवसांपूर्वी उत्तर वझिरिस्तानमध्ये एक फतवा जारी केल्याची माहितीही समोर आली आहे. ‘पाकिस्तानविरोधातील आमचे युद्ध यापुढेही सुरू राहणार आहे. येणाऱ्या काळात पाकिस्तानी लष्करासह इतर यंत्रणांवर दररोज हल्ले चढविण्यात येतील. त्यामुळे शांतता प्रस्थापित होईपर्यंत या भागातील नागरिकांनी माघारी लोटण्याचा विचार करू नये’, असा इशारा ‘तेहरिक-ए-तालिबान’ने दिला आहे. या दहशतवादी संघटनेच्या कारवायांवर पाकिस्तानी लष्करातही चिंतेचे वातावरण असून हे वाढते हल्ले अफगाणिस्तान शांतीप्रक्रिया उधळण्याचे प्रयत्न आहेत, असा दावा लष्करी प्रवक्त्यांनी केला.

leave a reply