पाकिस्तानचे भारताविरोधातील पुरावे बनावट

- भारताने फटकारले

बनावटनवी दिल्ली – ‘पाकिस्तान दहशतवादाचा प्रायोजक असून आपल्या देशात दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे, असे पाकिस्तानच्या नेतृत्त्वानेच जाहीरपणे कबुल केले आहे. जगभरात कुठेही झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे नेहमीच पाकिस्तानपर्यंत जातात. त्यामुळे भारताविरोधात बनावट कागदपत्रे आणि खोट्या कथा रचून पाकिस्तान दहशतवादाचा प्रायोजक असल्याच्या आरोपातून मुक्त होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानचे हे डावपेच चांगलेच ओळखून आहे’, अशा तिखट शब्दात भारताने पाकिस्तानच्या आरोपांचा समाचार घेतला. तर भारतापाठोपाठ अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानचे दहशतवादासंबंधीचे आरोप धुडकावून पाकिस्तानच अफगाणिस्तानातील अस्थैर्याचे मुख्य कारण असल्याचा ठपका ठेवला.

भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करण्याच्या तयारीत असून पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये भारताच्या कथित सहभागाचे पुरावे असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण खोटेनाटे आरोप करुन भारताविरोधात अपप्रचार करणार्‍या पाकिस्तानचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कठोर शब्दात वाभाडे काढले. भारताच्या विरोधात पुराव्यांचे तथाकथित दावे करणार्‍या पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणीही विश्वास ठेवत नाही. त्याचबरोबर पाकिस्तान दावा करीत असलेले पुरावे पूर्णपणे बनावट असून कपोलकल्पित असल्याची टीका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी केली.

बनावट

परराष्ट्र धोरणात सपशेल अपयशी ठरलेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या विरोधात विजय मिळविण्यासाठी कमालीचा अधीर झाला आहे. पण भारतावर दहशतवादाचे आरोप करणार्‍या पाकिस्तानचे सर्व डावपेच आंतरराष्ट्रीय समुदाय पूर्णपणे ओळखून असून पाकिस्तानच्या भारताविरोधातील आरोपांना अजिबात थारा मिळणार नाही, याची जाणीव श्रीवास्तव यांनी करून दिली. त्याचबरोबर भारतावर दहशतवादाचे आरोप करणार्‍या पाकिस्तानच्या नेतृत्त्वानेच स्वत:च्या देशात दहशतवाद्यांचा कारखाना असल्याचे मान्य केले होते. तसेच अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन हा देखील पाकिस्तानातच आश्रय घेऊन होता, याची आठवणही श्रीवास्तव यांनी करुन दिली. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांच्या सरकारमधील एका नेत्याने पाकिस्तानच्या संसदेतच पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची जाहीर कबुली दिली होती, याकडेही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लक्ष वेधले.

भारताप्रमाणे अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या आरोपांच्या चिंधड्या उडविल्या. पाकिस्तानात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर होत असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारची सत्यता नसल्याचे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले. पाकिस्तानला हवे असल्यास या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात यावी, असेही अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुचविले. याउलट अफगाणिस्तानात पाकिस्तानसंलग्न दहशतवादी सापडत असून ते अफगाणी लष्कराच्या कारवाईत मारले जात असल्याची आठवण अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने करुन दिली.

दरम्यान, काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरुन दहशतवादी घुसविण्यासाठी पाकिस्तानी लष्कर जोरदार प्रयत्‍न करीत आहे. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचे हे प्रयत्‍न हाणून पाडले असून पाकिस्तानी लष्कराला अद्दल घडविली आहे. या अपयशाकडून पाकिस्तानी जनता व आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तान भारतावर दहशतवादाचे आरोप करीत आहे. मात्र या आरोपांवर पाकिस्तानचे इतर राजकीय पक्षही विश्वास ठेवायला तयार नाहीत.

leave a reply