२ ते १८ वयोगटाच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा

- डीसीजीआयची ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी

नवी दिल्ली – ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) दोन ते १८ वर्षांंच्या मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी दिल्याने देेशातील कोरोनाविरोधातील लसीकरणाला मोठे बळ मिळाले आहे. देशात लहान मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन मंजुरी मिळालेली ही दुसरी लस ठरली आहे. याआधी झायडस कॅडिला ‘जॉयकोव्ह-डी’ या लसीला ऑगस्ट महिन्यात मंजुरी मिळाली होती. मात्र ही लस १२ ते १८ वर्षांच्याच मुलांना देता येणार आहे. तर ‘कोव्हॅक्सिन’ लस दोन वर्षांपासूनच्या सर्व मुलांना देता येणार असल्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बातमी ठरते.

२ ते १८ वयोगटाच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा - डीसीजीआयची ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरीदेशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ९६ कोटीहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. यातील बहुतांश लसीकरण हे कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या भारतात उत्पादन घेतलेल्या लसींद्वारे झाले आहे. १८ वर्षांखालील मुलांसाठी कोणतीही लस अद्याप भारतात अस्तीत्त्वात नाही. कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्यावर शाळा, महाविद्यालये हळूहळू सुरू होत आहेत. मात्र मुलांच्या सुरक्षेबाबात पालकांकडून सातत्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असेल, असे इशारे याआधी काही तज्ज्ञांनी दिले होते. त्यामुळे मुलांसाठी लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, जेणेकरून कोरोनाच्या संसर्गाशी निगडीत मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. या आघाडीवर मंगळवारी मोठी बातमी आली आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लसीद्वारे दोन ते अठरा वर्षांच्या मुलांचे लसीकरण करण्यासाठी आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे.

‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ च्या तज्ज्ञांनी ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या लहान मुलांवर घेण्यात आलेल्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांचे अहवाल तपासल्यावर या लसीला परवानगी द्यावी अशी शिफारस ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ला (डीसीजीआय) केली होती. त्यानंतर डीसीजीआयने ‘कोव्हॅक्सिन’ला लहान मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच भारत बायोटेकने ‘कोव्हॅक्सिन’च्या लहान मुलांवरील चाचण्यांचे अहवाल तज्ज्ञ समिती व डीसीजीआयकडे सादर केले होते व मंजुरीची परवानगी मागितली होती.

मात्र डीसीजीआयच्या मंजुरीनंतरही लहान मुलांसाठी ही लस उपलब्ध होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. साधारण डिसेंबर अखेरीस किंवा नव्या वर्षात हे लसीकरण सुरू होऊ शकते. लहान मुलांच्या लसीकरणासाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास तज्ज्ञ समितीला सांगण्यात आले आहे. व्याधीग्रस्त मुलांचे प्रथम लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, झायडस कॅडिलाच्या जॉयकोव्ह-डी या लसीला ऑगस्ट महिन्यात परवानगी देण्यात आली होती. ही लस जगातील डीएनए आधारीत पहिली कोरोना लस असून तीन डोस असणारी पहिली लस आहे. मोठ्यांबरोबर १२ ते १८ वर्षांतील मुलांसाठी ही लस उपलब्ध होणार आहे. मात्र यालाही थोडा अवधी लागणार आहे. पण येत दीड दोन महिन्यात देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

leave a reply