‘पीओके’च्या जनतेला भारतात सहभागी व्हायचे आहे

- 'यूएनएचआरसी'मध्ये 'पीओके'च्या कार्यकर्त्याची मागणी

संयुक्त राष्ट्रसंघ – ‘पीओके’मधील जनता पाकिस्तानच्या कचाट्यातून सुटण्यासाठी धडपडत आहे. इथल्या जनतेला जम्मू आणि काश्मीर व लडाखमध्ये सामील व्हायचे आहे’, असे ‘पीओके’चे कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) ठणकावून सांगितले. तसेच त्यांनी पाकिस्तानी लष्कराकडून ‘पीओके’च्या जनतेवर सुरु असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’च्या (सीपीईसी) अंतर्गत ‘पीओके’मधील नद्यांचे पाणी वळवून इथे पाण्याची भीषण टंचाई करीत असल्याचा आरोपही मिर्झा यांनी लावला.

‘यूएनएचआरसी’ने परकीयांच्या ताब्यात असलेल्या ‘पीओके’ च्या समस्येकडे लक्ष पुरवायला हवे, असे आवाहन मिर्झा यांनी यावेळी केले. कारण पाकिस्तानचे सरकार खोट्या बातम्या पसरवून जगाला भुरळ घालत आहे. प्रत्यक्षात येथे जनतेचा अन्वयित छळ चालू आहे. पाकिस्तानचे सरकार दहशतवादविरोधी कायदाचा वापर करुन विरोधात उठणारे आवाज दाबून टाकत असल्याचे मिर्झा यांनी म्हटले.

‘पीओके’मधील जनतेला पाकिस्तानपासून मुक्तता हवी आहे. त्यांना भारताच्या केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू आणि काश्मीर व लडाखमध्ये सामील व्हायचे आहे. त्यांना पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायचे आहे, याकडे मिर्झा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे लक्ष वेधले. पाकिस्तानचे लष्कर ‘पीओके’मधील महिलांवर अत्याचार करीत असल्याचे सांगून मिर्झा यांनी ‘यूएनएचआरसी’मध्ये पाकिस्तानचे वाभाडे काढले.

दरम्यान, ‘सीपीईसी’अंतर्गत केल्या जाणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान ‘पीओके’मधील नद्यांचे पाणी वळवित आहे. यामुळे ‘पीओके’मध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत आहे. या प्रकल्पांमुळे ‘पीओके’च्या पर्यावरणाचे देखील नुकसान होत आहे, असा आरोप मिर्झा यांनी लावला. या विरोधात ‘पीओके’च्या जनता सातत्याने निदर्शने करीत आहेत. पण पाकिस्तानचे सरकार ते मोडून काढत असल्याचे मिर्झा यांनी संयुक्त राष्ट्रसंघात ठणकावून सांगितले.

गेल्या काही दिवसात ‘पीओके’मधल्या जनतेचा चीन आणि पाकिस्तानविरोधाताला संताप वाढत चालला आहे. पाकिस्तान ‘पीओके’मधले हे प्रकल्प रद्द करीत नाही, तोवर हे आंदोलन सुरु राहणार असल्याचा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे.

leave a reply