महाराष्ट्रातील निर्बंधांचा कालावधी १ मेच्या पुढे वाढू शकतो

- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – सध्या महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडणे हा या निर्बंधांमागील हेतू आहे. मात्र कोरोनाच्या साथीची परिस्थिती पुढील पंधरा दिवसात अटोक्यात आली नाही, तर निर्बंधांचा कालावधी वाढू शकतो, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. शनिवारी राज्यात ४०० हून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी गेला, तर ६७ हजाराहून अधिक रुग्ण आढळले.

देेशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. तसेच या साथीने होणारे सर्वाधिक मृत्युही महाराष्ट्रात होत आहेत. प्रती दहा लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक संक्रमण असलेल्या देशातील दहा शहरांमध्ये चार शहरे महाराष्ट्रातील आहेत. नाशिक, नागपूर, पुणे आणि मुंबई ही शहरे कोरोना संक्रमणाच्या बाबतीत खूप भयावह परिस्थिती असलेली शहरे आहेत. लोकसंख्या आणि आढळत असलेल्या कोरोना रुग्णांचा विचार केल्यास नाशिक हे शहर या यादीत आघाडीवर आहे. नाशिकमध्ये गेल्या महिनाभराच्या कालाधीत सुमारे ९८ हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. नाशिकमधील लोकसंख्येचा विचार केल्यास महिनाभरात प्रति दहा लाख लोकसंख्येमागे ४६ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

हेच प्रमाण नागपूरमध्ये ४५ हजार ८०० इतके आहे. पुण्यात प्रति दहा लाख लोकसंख्येमागे ३६ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सुमारे कोरोनाच्या १८ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर लखनौ, बंगळुरू, भोपाळ, इंदौर, दिल्ली, पटना या शहरांचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात दरदिवशी ६० हजाराहून अधिक रुग्ण आणि साडेतीनशेहून अधिक मृत्यू कोरोनाने होत आहेत. शनिवारी महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनामुळे ४१९ इतके रुग्ण दगावले, तसेच कोरोनाच्या ६७ हजार १२३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. चोवीस तासात झालेले मृत्यू आणि रुग्णांच्या बाबतीत हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे.

मुंबईत एका दिवसात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ८३३४ नवे रुग्ण सापडले. पुणे जिल्ह्यात चोवीस तासात या साथीने ४७ जणांचा बळी गेला आणि ११ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले. पुण्यातील बळींमध्ये ८ बळी हे ग्रामीण भागातील असून ३६ बळी पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात झाले आहेत. शनिवारी एका दिवसात नागपूरमध्ये कोरोनानेे ७९ जणांचे प्राण घेतले आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यात सुमारे ७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या साथीचा झालेला उद्रेक थोपविण्यासाठी सध्या राज्यात पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन सदृष्य निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यभरात संचारबंदी असून अत्यावश्यक सेवा, जिवनावश्यक गोष्टींची दुकानेच सुरू आहेत. यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. पण काही ठिकाणी या निर्बंधांचा फज्जा उडताना दिसत असून मास्क लावण्याचे साधा नियमही पाळला जात नसल्याने संक्रमण अटोक्यात येताना दिसत नाही.

या पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी निर्बंधांचा कालावधी वाढू शकतो, असे म्हटले आहे. अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या परिस्थितीवर ही गोष्ट अवलंबून असेल. १५ दिवसांच्या संचारबंदीच्या निर्बंधांचा काय परिणाम झाला व त्यावेळच्या स्थितीचा आढावा घेऊन निर्बंधांचा कालावधी वाढवायचा का निर्णय घेतला जाईल, असे टोपे म्हणाले.

दरम्यान, जनतेकडून घालून देण्यात येत असलेल्या निबर्र्धांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने आता कडक लॉकडाऊन लावण्यावरही विचार होत असल्याचे संकेत राज्य सरकारकडून दिले जात आहेत. त्याचवेळी कोरोनाच्या साथीची तिसरी आणि पुढील लाटही येऊ शकते, अशी भिती व्यक्त करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगजगताला कोरोनाच्या साथीचा विचार करून आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याची सूचना केली आहे.

leave a reply