ब्रिटनमध्ये ‘फायझर’च्या कोरोना लसीला मान्यता

‘फायझर’लंडन – ‘लवकरच मदत उपलब्ध होणार आहे. ब्रिटीश यंत्रणेने फायझर-बायोएन्टेकच्या कोरोना लसीला मान्यता दिली आहे. ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा पुढील आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात करील. कोरोनाविरोधात लसीकरणासाठी मंजुरी देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे’, अशा शब्दात ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी ब्रिटनमध्ये कोरोना साथीविरोधात लस सर्वसामान्यांसाठी तयार झाल्याचे जाहीर केले. ब्रिटनच्या सरकारने या लसीचे चार कोटी डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, वृद्धाश्रमातील नागरिक व कर्मचारी, डॉक्टर्स व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल, असे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही पुढील आठवड्यात रशियात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी घोषणा केली आहे.

‘फायझर’

ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना साथीच्या रुग्णांची संख्या 16 लाखांवर गेली असून साथीमुळे 59 हजारांहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. देशात कोरोना साथीची दुसरी लाट सुरू असून काही भागात लॉकडाऊनचीही घोषणा करण्यात आली आहे. कोरोना साथीमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मंदीचाही फटका बसला असून 300 वर्षातील सर्वात मोठी घसरण होईल, असे भाकितही वर्तविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर, लसीला दिलेली मान्यता व लसीकरणाची सुरुवात ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरते. ब्रिटनबरोबरच अमेरिकेतही येत्या काही दिवसात कोरोनाविरोधातील लसीच्या वापराला मान्यता मिळेल, असे संकेत देण्यात आले आहेत.

ब्रिटनने मान्यता दिलेली लस अमेरिकी कंपनी ‘फायझर’ व ‘बायोएन्टेक’ या जर्मन कंपनीने संयुक्तरित्या विकसित केली आहे. ही लस ‘एम-आरएनए’ प्रकारातील असून साथीविरोधात 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. लसीसाठी कोरोना विषाणूच्या ‘जेनेटिक कोड’मधील एका भागाचा वापर करण्यात आला आहे. लस टोचल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक पेशी ‘स्पाईक प्रोटीन’ची निर्मिती करतात. त्यातून पुढे ‘अँटिबॉडिज्‌’ व ‘टी सेल्स’ तयार होतात आणि त्या कोरोना विषाणूचा मुकाबला करतात, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.

‘फायझर’

प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन डोस तीन आठवड्यांच्या अंतराने देण्यात येतील, अशी माहिती ब्रिटनमधील सूत्रांनी दिली. ब्रिटनमध्ये 7 डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असून आरोग्ययंत्रणेसह सुरक्षादलांनाही सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिटनबरोबरच ‘फायझर’ने अमेरिकेतही लसीच्या मान्यतेसाठी अर्ज केला असून, येत्या काही दिवसात त्याला मान्यता मिळेल असे सांगण्यात येते. ब्रिटनने लसीच्या वापराला मान्यता देण्यात घाई केली, असा दावा युरोपिय महासंघाकडून करण्यात आला आहे.

‘फायझर’व्यतिरिक्त ‘मॉडर्ना’, ‘ॲस्ट्राझेनेका’, ‘मर्क’ या कंपन्यांकडूनही लस विकसित करण्यात आली असून ती सध्या वेगवेगळ्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. रशिया तसेच चीनमधील कंपन्यांनीही लस विकसित केली असून, चीनने देशांतर्गत पातळीवर लसीकरणाला सुरुवात केल्याचे दावेही करण्यात आले होते. भारतातील ‘भारत बायोटेक’ या कंपनीनेही ‘कोवॅक्सिन’ नावाची लस विकसित केली असून त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यास सुरू आहेत. रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक’ या लसीची निर्मितीही भारतात होणार असल्याची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली होती.

leave a reply