जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील ऑपरेशन नवव्या दिवशीही सुरू

• लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी ऑपरेशनचा आढावा घेतला
• दहशतवाद्यांना टिपण्यासाठी पॅरा कमांडो उतरविण्यात आले

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये नियंत्रण रेषेलगतच्या भाटा धुरिया जंगलात सुरू असलेले ऑपरेशन नवव्या दिवशीही सुरू होते. दहशतवाद्यांना या भागातून निसटण्याची संधी मिळू नये यासाठी रात्रीही कारवाई सुरू आहे. हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्सद्वारे सतत लक्ष ठेवण्यात येत असून दहशतवाद्यांची ठिकाणी मॉर्टर्सचा मारा करून उद्ध्वस्त केली जात आहेत. जम्मू-काश्मीर दौर्‍यावर असलेले लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी या मंगळवारी सीमाचौक्यांना भेट दिली. तसेच हे ऑपरेशन सुरू असलेल्या भागाला भेट देऊन त्याचा आढावा घेतला आणि आवश्यक निर्देश दिले. येथे पॅरा कमांडोही उतरविण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंतच सर्वात मोठे ऑपरेशन जम्मूमध्ये सुरू आहे. येथील जंगलात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तविली जाते. याच ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत नऊ जवानही शहीद झाले आहे. घनदाट जंगल आणि तेथील नैसर्गिक गुंफांचा आधार दहशतवाद्यांनी लपण्यासाठी घेतला आहे. हवाई पहाणीतून मिळत असलेली माहिती आणि मिळणार्‍या सूचनांच्या आधारे या भागात मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि मॉर्टर्सचा मारा सुरू आहे व दहशतवाद्यांनी ठिकाणे नष्ट केली जात आहे. हे ऑपरेशन लवकरात लवचकर संपविण्याच्या सूचना लष्करप्रमुखांनी दिल्या आहेत. यासाठी रात्रीही ऑपरेशन रात्रीही सुरू ठेवण्यात आले होते.

लष्करप्रमुखांनी मंगळवारी ऑपरेशन सुरू असलेल्या पुंछमधील भाटा धुरियाला भेट दिली. येथे वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चेनंतर काही निर्देश लष्करप्रमुखांनी दिल्याचे सांगण्यात येते. येथे राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काश्मीरमधील जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवेचा वेग कमी करण्यात आला आहे. अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व नागरी जीवितहानी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. लष्कराचे जवान आणि पॅरा कमांडोंनी संपूर्ण भाटा धुरियाच्या जंगलाला वेढा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळा सुरू होऊन मोठ्या प्रमाणार बर्फ पडण्याआधी घुसखोरीचे मोठे षडयंत्र पाकिस्तानने रचल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घुसखोरीसाठी आता पाकिस्तान नवी पद्धत अवलंबत असून दहशतवादी गटांमध्ये नाही, तर एक एक करीत घुसखोरी करीत आहेत. तसेच विनाशस्त्रही घुसखोरी करण्यात येत आहे. घुसखोरी केल्यानंतर या दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा हा ड्रोनद्वारे केला जात असल्याचे लक्षात आले आहे.

या आपॅरेशनमध्ये आतापर्यंत नऊ भारतीय जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांची कार्यपद्धती पाहता हे लष्करी प्रशिक्षित दहशतवादी आहेत किंवा पाकिस्तानचे लष्कराचे जवानच दहशतवादी म्हणून घुसल्याची शंका काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेतला जाणार नसून दहशतवाद्यांनी बदललेल्या कार्यपद्धतीनुसार सुरक्षादलांना आपली व्यूहरचनाही बदलावी लागणार आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply