भारतात पीओकेच्या सहभागाची शक्यता नाकारता येत नाही – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली- चीनबरोबर भारताचा सीमावाद सुरू आहे. पण दोन्ही देशांना तणाव वाढविण्यास स्वारस्य नाही. असे असले तरी या वादात कुठल्याही परिस्थितीत देशाची मान झुकू दिली जाणार नाही, अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. त्याचवेळी पाकिस्तानव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारत कारवाई करू शकतो, असे स्पष्ट संकेत राजनाथ सिंग यांनी दिले आहेत. वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत  संरक्षणमंत्र्यांनी  भारत आणि पाकिस्तान बरोबरच्या सीमावादाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली.

राजनाथ सिंग

लडाखच्या सीमेवर भारताचे सैनिक आणि चीनचे जवान एकमेकांसमोर खडे ठाकले असून इथे कुठल्याही क्षणी संघर्षाचा भडका उडू शकेल, असे दावे केले जातात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता वर्तवून त्यावर चिंता व्यक्त केली होती. तसेच दोन्ही देशांमधील सीमावाद सोडविण्याची मध्यस्थी करण्याची तयारीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दाखविली होती. मात्र भारत व चीनने देखील सीमावाद वाटाघाटीने सोडविण्याची तयारी दाखवून अमेरिकेच्या मदतीचा प्रस्ताव नाकारला होता.

या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती  दिल्या आहेत.  भारताला सीमावाद वाढवायचा नाही. मात्र कुठल्याही परिस्थितीत देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. सरकार देशाची मान खाली झुकू देणार नाही, अशा नेमक्या शब्दात संरक्षणमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. लडाख तसेच सिक्कीमच्या सीमेवर चीन दाखवीत असलेल्या लष्करी आक्रमकतेमागे भारताने पीओके व गिलगिट-बाल्टिस्तानचा ताबा घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत, असा दावा काही लष्करी विश्‍लेषकांकडून केला जातो. पाकिस्तानच्या ताब्यात आलेल्या अक्साई चीनचा भाग पाकिस्तानने चीनला बहाल करून टाकला होता.  पीओके तसेच गिलगिट बाल्टिस्तानचा ताबा घेताना भारत ‘अक्साई चीन’ मिळवण्याचाही प्रयत्न करेल, अशी भीती चीनला वाटत आहे. म्हणूनच चीन आक्रमक लष्करी प्रदर्शन करीत असल्याचे या लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अशावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पीओके बाबत सूचक विधान केले आहे. भारत पीओकेचा ताबा घेणार का? या विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षणमंत्र्यांनी काहीही होऊ शकते असे सूचक उत्तर दिले. काही दिवसांपूर्वीच भारताने पाकिस्तानला पीओके खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर भारत पीओके व गिलगिट बाल्टिस्तानचा ताबा घेण्यासाठी हल्ला चढविल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये भारताने हल्ल्याची पूर्ण तयारी केल्याचे दावे ठोकले जात आहेत. मात्र याची पूर्ण कल्पना असूनही पाकिस्तानचे सरकार भारताला शाब्दिक उत्तर देण्यात  गुंतलेले आहे, अशी खंत पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत.

leave a reply