पाकिस्तानात इम्रान यांच्याविरोधात ’मायनस फॉर्म्युला’ची तयारी

- पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

इस्लामाबाद – पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था बुडवली असून आंतररा‌ष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाला किंमत उरली नसल्याची जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानी माध्यमांपासून येथील जनताही खान यांच्या धोरणांवर ताशेरे ओढू लागली आहे. देशातील या अस्थैर्यासाठी खान यांना जबाबदार धरुन, पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ने “मायनस फॉर्म्युला” म्हणजे खान यांना पदावरुन खाली खेचून त्यांच्या जागी दूसरा पंतप्रधान नेमण्याची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण पंतप्रधान खान आणि पाकिस्तानच्या लष्कराने या बातम्या फेटाळल्या आहेत.

Pakistan-Imran-Khanइम्रान खान यांचे नेतृत्व देशाला दिशा देण्यात अपयशी ठरले आहे. राजकीय, आर्थिक तसेच लष्करी आघाडीवरही खान यांनी पाकिस्तानला तोंडघशी पाडल्याचा ठपका ठेवून आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराने आपल्या हालचाली वाढविल्याच्या बातम्या पाकिस्तानी वृत्तवाहिन्या देत आहेत. पाकिस्तानच्या राजकारणावर पकड असलेल्या लष्कराने खान यांना पंतप्रधान पदावरुन खाली खेचण्याची तयारी केली असून योग्य वेळी नेतृत्व बदल केला जाईल, असे दावे केले जात आहेत.

इम्रान खान यांच्यावरील या नाराजीचा सर्वात मोठा खुलासा संयुक्त राष्‍ट्रसंघातील पाकिस्तानच्या माजी राजदूत मलिहा लोधी यांनी ‘डॉन’ या पाकिस्तानी दैनिकातील लेखात केला. लोधी या पाकिस्तानी लष्कराच्या मर्जीतील मानल्या जातात. त्याचबरोबर पाकिस्तानचे परराष्‍ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि पंतप्रधान खान यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. कुरेशी हे पाकिस्तानी लष्कराचे खास मानले जात असून खान यांच्याजागी कुरेशी यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा देखील पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरू होती.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने यासंबंधीच्या बातम्या फेटाळल्या आहेत. मात्र खान यांना सत्तेवर बसवून मग योग्यवेळी त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची योजना फार आधीच तयार झाली होती, असेही बोलले जाते.

leave a reply