सौदीच्या ‘नॅशनल डे’मध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची उपस्थिती

नवी दिल्ली – दिल्लीतील दूतावासात सौदी अरेबियाचा ‘नॅशनल डे’ साजरा करण्यात आला. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या उपस्थितीने भारत आणि सौदीमधील वाढलेल्या सहकार्याचे आणि दृढ झालेल्या संबंध अधोरेखित झाले आहेत. पाकिस्तान आणि सौदीचे संबंध ताणलेले असताना भारत आणि सौदीमधल्या या घडामोडी लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजे सलमान यांची फोनवरून चर्चा पार पडली होती.

'नॅशनल डे'

बुधवारी सौदी अरेबियाचा ९०वा ‘नॅशनल डे’ होता. या निमित्ताने भारतातल्या सौदीच्या दुतावासाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल आणि भारताचे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नख्वी उपस्थित होते. देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एखाद्या देशाच्या दूतावासात त्यांच्या राष्ट्रीय दिवसासाठी उपस्थित ही दुसरी वेळ आहे. याआधी २०१८ साली भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या रशियाच्या ‘नॅशनल डे’ कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

भारत सौदीचा जवळचा मित्र आणि महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार देश आहे’, असे सौदी अरेबियाचे भारतातील राजदूत डॉ. सौद बीन मोहम्मद अल सती यांनी म्हटले आहे. भारताचे सौदीबरोबर सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध समान आदर आणि परस्पर हितसंबधांवर आधारीत असल्याचे सती यावेळी म्हणाले . सौदी भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे.तसेच भारत सौदीकडून १८ टक्के कच्चे तेल आयात करतो, असे सांगून सती यांनी सौदी आणि भारताच्या संबंधाचे महत्त्व अधोरेखित केले. सौदीची भारतातली गुंतवणूक वाढत असल्याचे सती म्हणाले.

उभय देशांचा द्विपक्षीय व्यापार ३४ अब्ज डॉलर्सवर आहे. तो वाढविण्यावर उभय देश भर देत आहेत. २०१९ साली सौदीच्या राजे सलमान यांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सौदीला भेट दिली होती. यानंतर दोन्ही देशांचे संबंध बळकट होत गेल्याचे सांगितले जाते. बु़धवारी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांना ‘नॅशनल डे’च्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच सर्वच क्षेत्रातील भारत आणि सौदीचे संबंध दृढ होतील, असा विश्वास परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजे सलमान बिनअब्दुल अजीज अल सौद यांची फोनवरून चर्चा पार पडली होती. याचे अधिक तपशील प्रसिद्ध झाले नव्हते. पण त्याआधीच पाकिस्तान आणि सौदीमध्ये तणाव निर्माण झाला होता. ‘ओआयसी’च्या बैठकीत सौदीने जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित करायला नकार दिला होता. यानंतर पाकिस्तानने सौदी अरेबिया विरोधात भूमिका घेत आपला स्वतंत्र गट तयार करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सौदी अरेबिया पाकिस्तानवर संतापलेला असून यापार्श्वभूमीवर भारत सौदीमधील दृढ होणारे संबंध लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत.

leave a reply