इराणमधील पाणी टंचाईची समस्या तीव्र

  • निदर्शकांच्या हल्ल्यात पोलीस जवान ठार झाल्याचा आरोप
  • बळी गेलेल्यांची खरी संख्या लपविली जात असल्याचा निदर्शकांचा ठपका
  • खुझेस्तानमधील दुष्काळ मानवनिर्मित असल्याच्या संतप्त निदर्शकांच्या घोषणा

पाणी टंचाईतेहरान – गेल्या सहा दिवसांपासून इराणच्या खुझेस्तान प्रांतात पाणी टंचाईवरुन सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये एका जवानाचा बळी गेला असून एकजण जखमी झाला आहे. निदर्शकांनी केलेल्या गोळीबारात जवान गमावल्याचा आरोप इराणी यंत्रणांनी केला. पण या निदर्शनांमध्ये आम्हीच मोठ्या संख्येने साथीदार गमावले असून इराणी यंत्रणा त्याची माहिती उघड करायला तयार नसल्याचा ठपका निदर्शकांनी ठेवला. त्याचबरोबर इंधनसंपन्न असलेल्या आपल्या प्रांतावर ओढावलेले हे संकट मानवनिर्मिती असल्याचा आरोप निदर्शक करू लागले आहेत. दरम्यान, या निदर्शनांची धग राजधानी तेहरानपर्यंत पोहोचली असून येथे निदर्शकांनी इराणी राजवटविरोधात घोषणा दिल्याचे व्हिडिओज् समोर आले आहेत.

इराणच्या नैऋत्येकडील खुझेस्तान प्रांतात गेल्या आठवड्यापासून पाणी टंचाईविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. इराणच्या सरकारने खुझेस्तानला दुष्काळग्रस्त जाहीर केले, पण येथील जनतेसाठी पाण्याची सोय केली नाही, असा आरोप निदर्शकांनी केला. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या सहा दिवसांपासून खुझेस्तानच्या वेगवेगळ्या भागात इराणमधील राजवटीविरोधात निदर्शने सुरू असल्याच्या बातम्या येत अहेत.
पाणी टंचाईखुझेस्तानमध्ये सुरू असलेल्या या निदर्शनांकडे इराणमधील सरकारी माध्यमांनी पाठ फिरविल्याची टीका केली जाते. तसेच गेल्या काही दिवसांपासून येथील प्रमुख शहरांमध्ये जनतेला इंटरनेट ब्लॅकआऊटला सामोरे जावे लागत असल्याचा दावा केला जातो. इराणची राजवट आपल्या अधिकारांचा वापर करून खुझेस्तानचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका संतप्त नागरिक करीत आहेत. त्याचबरोबर इराणच्या सुरक्षा यंत्रणांकडून केलेली कारवाई देखील दाबली जात असल्याचे निदर्शकांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यातील निदर्शनांमध्ये दोन जणांचा बळी गेला होता. निदर्शकांनीच केलेल्या गोळीबारात या नागरिकांचा बळी गेल्याचा दावा इराणच्या यंत्रणने केला होता. पण दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या व्हिडिओनुसार, इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी निदर्शकांवर गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी रात्री देखील इराणी यंत्रणांनी निदर्शकांवर अश्रुधूराचा वापर केल्याचे एका व्हिडिओतून उघड झाले.

पाणी टंचाईखुझेस्तानमधील या निदर्शनांचे पडसाद आता राजधानी तेहरानमध्ये उमटू लागले आहेत. तेहरानच्या रस्त्यांवर खुझेस्तानची जनता व त्यांचे समर्थक खामेनी राजवटीविरोधात तर 1979 सालच्या इस्लामी क्रांतीआधी इराणमध्ये सत्ता असलेल्या रेझा शाह पहलवी यांच्या समर्थनार्थ घोषणा देत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. काही निदर्शकांनी तर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधातच घोषणा दिल्या.

दरम्यान, खुझेस्तानमधील दुष्काळ हा मानवनिर्मित असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. खुझेस्तान इराणमधील सर्वात मोठा इंधनसंपन्न प्रांत असून इराणच्या एकूण इंधन साठ्यात खुझेस्तानातील 57 टक्के इंधन साठ्याचा समावेश आहे. तरी देखील खुझेस्तानातील पाणी टंचाईकडे इराणची राजवट दुर्लक्ष करीत असल्याचा संताप स्थानिक व्यक्त करतात. त्यातच इराणमधील सुन्नी अल्पसंख्यांक खुझेस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला भेदभावपूर्ण वागणूक दिली जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

leave a reply