कोकणासह राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार; चिपळूणमध्ये 26 जुलैसारखी परिस्थिती

- मुंबई-गोवा मार्ग बंद, कोकणरेल्वेही ठप्प कोल्हापूर, सांगली, अमरावती, परभणी, वाशिम, अकोल्यातही पूरसदृष्य परिस्थिती

चिपळूणबुधवारी रात्रीपासून कोकणात झालेल्या अतिवृष्टीने रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना मोठा तडाखा दिला आहे. कित्येक लहान मोठ्या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या आहे. नाले, ओढेही तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे नदीकाठी वसलेली गावे आणि शहरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. कोकणातील कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. चिपळूणमध्ये सर्वात भीषण परिस्थिती असून येथील वसिष्ठी नदीचे पाण्यामुळे संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेले आहे. चिपळूणनजीक कोयनानदीवर असलेल्या कोळकेवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उत्सर्ग करण्यात आल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येते. याशिवाय ठाणे, पालघर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून कित्येक ठिकाणी सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणारी ठाणे जिल्ह्यातील तानसा, मोडकसागर ही धरणेही भरून वाहू लागली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे आधीच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. त्यामुळे मंगळवारपासून झालेल्या अतिवृष्टीने कोकण किनारपट्टी भागातील परिस्थिती गंभीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचिपळूणमध्ये महापूर आला असून यासाठी केवळ अतिवृष्टी कारण नसून कोळकेवाडी येथील जलविद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर झालेला पाण्याचा विसर्गही कारणीभूत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. पहाटे चार वाजता धरणातून हा विसर्ग झाला. त्यामुळे सकाळी सहा वाजेपर्यंत नागरीक झोपेत असतानाच पाणी घरांमध्ये शिरले.

चिपळूणमध्ये 26 जूलै 2005 रोजी असलेल्या परिस्थितीपेक्षा भयंकर स्थिती यामुळे येथे ओढावली आहे. संपूर्ण चिपळूण शहर आणि आजूबाजूची गावे पाण्याखाली गेली आहेत. मुंबई-गोवा महामार्गही पाण्याखाली आहे. पूराचे पाणी कित्येक घरात शिरले आहे. काही भागात इमारतीचा पहिला मजलाही बुडाला आहे. या पुराच्या पाण्याबरोबर वशिष्ठी नदीमधील मगरी, सर्पही शहरात वाहून आल्याचे चित्र आहे. या पूरात तीन जणांाचा बळी गेल्याचे वृत्त असून एनडीआरएफच्या पथकासह राज्याच्या आपत्ती निवारण विभागाने बचावकार्य हाती घेतले आहे. पूराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

तसेच चिपळूणजवळील कामथे रेल्वे स्थानकही पाण्याखाली गेले आहे. यामुळे कोकण रेल्वेची वाहूतकही ठप्प झाली आहे. यामुळे कोकण रेल्वेमार्गावर रेल्वे गाड्यांमध्ये सहा हजार प्रवासी अडकून पडले आहेत. हे प्रवासी सुखरुप असून त्यांना अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे कोकणरेल्वेतर्फे सांगण्यात आले.

रायगडात चोवीस तासात कित्येक भागात 200 एमएम पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. रायगडातील प्रमुख नदी असलेल्या सावित्रीनदीलाही पूर आला असून महाड शहरात हे पाणी शिरले आहे. महाड बाजारपठेत आठ ते दहा फूट पाणी आहे. सावित्रीनदीशिवाय अम्बा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास या नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहत असून नदी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगडातही एकाचा या अतिवृष्टीत बळी गेल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील वशिष्ठी नदीसह जगबुडी, कोदावली, शास्त्री, बावनदीलाही पूर आला आहे. खेडमध्येही येथील जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे भयंकर परिस्थिती ओढावली असून नदीकाठची काही घरे वाहून गेली आहेत. तसेच मुंबई गोवा मार्गही पाण्याखाली आहे. बाजरपेठेप अनेक दुकानात पाणी शिरले आहे. त्याचबरोबर संगमेश्‍वर येथे बावनदीला आलेल्या पुरामुळे संगमेश्‍वर बाजारपेठेसह तालुक्यातील इतर गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. रत्नागिरी शहरातही कित्येक सखल भागात पाणी साठले आहे.

चिपळूणयाखेरीज लांजातही अतिवृष्टीमुळे अंजणारी पुलावरील वाहतूक बंद करावी लागली. राजापूरातही अर्जुना नदीचे पाणी शहरात शिरले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात भूईबावडा येथे दरड कोसळली आहे. सलग तिसर्‍या दिवशी भूईबावडा घाटात दरड कोसळली. तसेच कसरा घाटातही दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूर, सांगली, अमरावती परभणी, जालना, वाशिम, अकोल्यातही पूरसदृष्य स्थिती आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातही काही भागात मोठा पाऊस झाला असून गोदावरी दुधडी भरुन वाहू लागली आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यावर कोल्हापूरात दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापूराच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यामुळे नदी किनारील गावे रिकामी होण्यास सुरूवात झाली आहे. येथील नागरिक इतरत्र ठिकाणी स्थलांतरण करीत आहेत.

कोल्हापूरातील 105 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगलीही वारणा, पुण्यात इंद्रायणी या नद्यांची पातळी वाढली आहे. नदीकाठचे काही भाग पाण्याखाली गेले आहे. पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण भरले आहे. अकोला, अमरावती, जालनामध्ये भीषण परिस्थिती असून या जिल्ह्यांमध्येही कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे.

leave a reply