दहशतवादाचा मार्ग सोडणाऱ्या काश्मिरी तरुणांसाठी पुनर्वसन योजना

- लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू

नवी दिल्ली – दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या जम्मू काश्मीरमधील तरुणांसाठी सरकारकडून लवकरच आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण राबविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालया यावर काम करीत आहे, अशी माहिती लष्कराने दिली. नुकतेच एका कारवाई दरम्यान भरकटून दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या एका काश्मिरी तरुणाचे आत्मसमर्पण करण्यास लष्करी अधिकारी यशस्वी ठरले होते. याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

Advertisement

पुनर्वसन

भारतीय लष्कराकडून शस्त्रास्त्र खाली ठेऊन भरकटून दहशतवादी बनलेल्या तरुणांच्या शरणागतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांचे समाजात पुनर्वसन योग्य प्रकारे होईल, असे १५ कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू म्हणाले. दिशाभूल झालेले तरुण शस्त्र उचलून दहशतवादी बनतात. या तरुणांना ठार मारणे लष्कराला आवडत नाही. दहशतवादविरोधी कारवाईच्या वेळी जवान या तरुणांना आपली बंदूक खाली ठेऊन आत्मसमर्पण करण्यास उद्युक्त करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात, असे बी. एस. राजू यांनी लक्षात आणून दिले.

स्थानिक तरुण जेव्हा जेव्हा दहशतवादी संघटनेत सहभागी होतो तेव्हा त्याला आधी शरण येण्यास सांगण्यात येते. एखाद्याने बंदूक घेऊन फोटो काढल्यास त्याला ठार केले पाहिजे, असे नाही असे लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू म्हणाले. लष्कराकडून दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून ते दहशतवादाचा मार्ग सोडतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सरकार आत्मसमर्पण व पुनर्वसन योजना तयार करण्यात येत आहे. संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालय यावर विचार करीत असल्याचे, लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी स्पष्ट केले. यावर्षी शस्त्र हाती घेणाऱ्या तीन तरुणांनी आत्मसमर्पण केले आहे. तर आतापर्यंत ५० स्थानिक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारनू भागात चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. या दहशतवाद्याकडील एक एके-४७ रायफल जप्त करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचे एक ठिकाण उद्धवस्त केले. येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

leave a reply