संशोधकांनी ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली

- नव्या व्हेरियंटमुळे चिंता

नवी दिल्ली – केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण वाढीच्या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही तिसरी लाट शिखर गाठू शकते. तसेच तिसऱ्या लाटेत दरदिवशी आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या एक लाखांवर जाऊ शकते, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचा प्रभाव खूप कमी असेल, असेही संशोधकांनी म्हटले आहे. मात्र एखादा नवा व्हेरियंट आल्यास परिस्थितीत बदल होईल, अशी भितीही संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधक तिसऱ्या लाटेबाबत हा इशारा देत असताना कोरोनाचा नवा घातक प्रकार सापडला आहे. सुदैवाने अद्याप त्याची भारतात नोंद झालेली नाही. पण याबाबतीत सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

केरळातील रुग्ण वाढीनंतर गेल्या आठवड्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांची सरासरी गेल्या आठ आठवड्यात सर्वोच्च ठरली आहे. गेल्या आठवडाभरात सापडलेले 66 टक्के नवे रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. यामुळे केरळचा पॉझिटिव्ह दर हा 19 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही एक टक्क्यांची मामूली वाढ दिसून आली आहे. केरळमध्ये संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर केंद्राच्या सूचनेनुसार केरळ सरकारने सोमवारपासून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

दुसरी लाट अजून पुर्णपणे गेली नसली, तरी केरळ व महाराष्ट्र वगळता देशाच्या इतर भागात ती बरीच कमकूवत झाली आहे. पण त्याचवेळी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ही तिसरी लाट कधी येईल याबाबत निरनिराळे अंदाज वर्तविले जात आहेत. याआधी सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका काही तज्ज्ञांनी वक्त केला होता. तर आता कानपूर आयआयटीच्या संशोधकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही तिसरी लाट येईल, असे म्हटले आहे. मात्र दुसऱ्या लाटेच्या एक चतुर्थांश रुग्णच तिसऱ्या लाटेत दरदिवशी सापडतील. थोडक्यात तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमकूवत असेल, असा अंदाज आयआयटीच्या संशोधकांनी वर्तविला आहे.

दुसऱ्या लाटेत दैनंदिनी रुग्णांची संख्या चार लाखांवर पोहोचली होती. तर तिसऱ्या लाटेत ही संख्या जास्तीत जास्त एक लाखांवर असेल, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यास व त्याचा प्रभाव वाढल्यास या परिस्थितीत बदल होईल, असेही संशोधकांनी अधोरेखित केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार आढळल्याचे वृत्त आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचे नाव सी1.2 असून यावर्षी मे महिन्यात पहिल्यांदा याची नोंद दक्षिण आफ्रिकेत झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाचा हा व्हेरियंट चीन, ब्रिटन, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, मॉरिशस, न्यूझिलंड, काँगो अशा विविध देशांमध्ये आढळला आहे. कोरोनाचा सी1.2 हा व्हेरियंट कोरोना लसीपासून मिळणाऱ्या सुरक्षेलाही चकवू शकतो, असे संशोधनात लक्षात आले आहे. यामुळे चिंता वाढल्या आहेत. भारतात अद्याप हा व्हेरियंट आढळलेला नाही. मात्र या आघाडीवर सावध राहण्याची आवश्‍यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply