चीनमधील वीजटंचाई व वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ

वॉशिंग्टन/लंडन – सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांनी प्रति बॅरल ८६ डॉलर्सवर उसळी घेतली. तर अमेरिकेत प्रति बॅरल ८३ डॉलर्सहून अधिक दराने व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या एका आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.

चीनमधील वीजटंचाई दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी चीनच्या राजवटीने आपल्या इंधन कंपन्यांना मिळेल त्या मार्गाने व दराने इंधनाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. कारण चीनच्या बाजारपेठेतील इंधनाची मागणी वाढत चालली आहे. त्याचा थेट परिणाम इंधनाच्या दरांवर दिसून येत आहे. चीनमधील मागणीमुळे कोळसा व नैसर्गिक इंधनवायूचे दर आधीच विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. त्यापाठोपाठ आता कच्च्या तेलाचे दरही वाढण्यास सुरुवात झाली आहे.

१० दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या दरांनी प्रति बॅरल ८० डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता. आता त्यात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ८६.०४ प्रति बॅरल असे नोंदविण्यात आले. त्याचवेळी अमेरिकेतील ‘वेस्ट टेक्सास क्रूड फ्युचर्स’मध्येही कच्च्या तेलाचे दर ८३.७३ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत गेले आहेत. अमेरिकेतील दर गेल्या सात वर्षातील विक्रमी स्तरावर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यात कोरोना साथीच्या संकटातून जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे इंधनाची तसेच वीजेची मागणी वाढू लागली आहे. मात्र त्याचवेळी कोळसा, नैसर्गिक इंधनवायू व कच्च्या तेलाचे उत्पादन मागणीच्या तुलनेत न वाढविल्याने, याच्या दरांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ व ‘ओपेक प्लस’ या गटांमध्ये झालेल्या बैठकीत इंधनपुरवठा वाढविण्याच्या करारावर एकमत झाले होते. करारानुसार, ऑगस्ट महिन्यापासून कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन चार लाख बॅरल्सने वाढविण्यात आले आहे.

पण कच्च्या तेलाची मागणी वेगाने वाढत असून पुरवठा मर्यादित राहिल्याने दरही वाढण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात, अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ गटाला उत्पादन वाढविण्याचे निर्देश दिले होते. पण ओपेकने अमेरिकेची सूचना नाकारली असून आपल्या करारावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तेलाच्या दरांमध्ये वाढ होण्याचे सत्र कायम राहिले आहे.

काही दिवसांपूर्वी, कच्च्या तेलातील दरांच्या उसळीनंतर प्रमुख वित्तसंस्था व विश्‍लेषकांनी पुन्हा एकदा तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडू शकतो, असे भाकित वर्तविले होते. कोरोनाच्या साथीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना, इंधनाची दरवाढ नवे आर्थिक संकट घेऊन येईल, असा इशारा भारताने इंधनाचे उत्पादन करणार्‍या देशांना दिला होता.

leave a reply