लेबेनॉनमधून इस्रायलवर रॉकेट हल्ले

- इस्रायलकडून प्रत्युत्तर

रॉकेट हल्लेतेल अविव – बुधवारी दुपारी लेबेनॉनमधून इस्रायलवर तीन रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यात इस्रायलची जीवितहानी झाली नाही. पण इस्रायली लष्कराने लेबेनॉनच्या दक्षिणभागात तोफगोळे डागून या हल्ल्यांना उत्तर दिले. लेबेनॉनमधून झालेल्या या हल्ल्यांमागे इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

इस्रायली माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, लेबेनॉनच्या हद्दीतून रॉकेटचा मारा झाला. यापैकी एक रॉकेट लेबेनॉनमध्येच कोसळले. तर दोन रॉकेट्स इस्रायलच्या किरयात श्मोना शहरातील क्फार गिलादी आणि तेल हाई येथील मोकळ्या मैदानात कोसळले. या रॉकेट हल्ल्यांबरोबर किरयात श्मोना शहरातील सायरन वाजून स्थानिकांना अलर्टचा संदेश देण्यात आला. त्यामुळे काही काळ इस्रायलच्या उत्तरेकडील भागात तणाव निर्माण झाला होता.

रॉकेट हल्लेयानंतर इस्रायलच्या लष्कराने लेबेनॉनच्या दक्षिणेकडील गावांना लक्ष्य केले. येथील मारायून आणि खियाम या गावांवर इस्रायली तोफगोळे डागल्याचा दावा स्थानिक करत आहेत. सीमेच्या दोन्ही बाजूच्या या हल्ल्यांमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे माध्यमांनी प्रसिद्ध केले. बुधवारच्या या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. इस्रायलच्या लष्कराने देखील आरोप करण्याचे टाळले आहे.

इस्रायली माध्यमांनी या हल्ल्याचा संबंध लेबेनॉनमधील इराणसंलग्न पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांशी असल्याचे म्हटले आहे. काही तासांपूर्वी ओमानच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास करणार्‍या इस्रायली मालवाहू जहाजावर ड्रोन्सचे हल्ले झाले होते. यासाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. तसेच इराणला उत्तर देण्याचा इशारा इस्रायलने दिला होता. यानंतर इराणने इस्रायल जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. बुधवारी लेबेनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत झालेल्या रॉकेट हल्ल्यांचा संबंध इराणच्या धमकीशी असल्याची शक्यता वर्तविली जाते.

leave a reply