चीन व रशियापासून ‘अमेरिकन सुएझ’ला धोका

- अलास्काच्या गव्हर्नरचा इशारा

जुनेऊ – आठवड्याभरापूर्वी ‘एव्हर गिव्हन’ मालवाहू जहाज सुएझ कालव्यात रूतल्यानंतर जगभरातील सागरी वाहतूक प्रभावित झाली होती. जागतिक वाहतुकीपैकी १२ टक्के इतकी वाहतूक या सुएझ कालव्यातून केली जाते. पण भविष्यात यापेक्षा अधिक मालवाहतूक करण्याची क्षमता असलेले ‘अमेरिकन सुएझ’ अर्थात आर्क्टिक क्षेत्राला मोठा धोका निर्माण झाला आहे. चीन आणि रशिया या अमेरिकन सुएझचा ताबा घेऊ शकतात, असा इशारा अलास्काचे गव्हर्नर माईक डनलेवी यांनी दिला. तसेच अमेरिकन प्रशासनाने यासाठी जलदगतीने पावले उचलावी, असे आवाहनही डनलेवी यांनी केले.

Advertisement

अमेरिकेतील एका वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखात गव्हर्नर डनलेवी यांनी अलास्काच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने तातडीने योजना तयार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. सध्या हिमनगांनी व्यापलेल्या आर्क्टिकच्या नॉर्दन सीच्या क्षेत्रातून मालवाहतूक करणे अवघड जात आहे. पण भविष्यात अशी परिस्थिती कायम नसेल.

पुढील ३० वर्षांमध्ये सदर सागरी क्षेत्रातील हिमनगांचे अडथळे दूर होतील व येथून मोठ्या प्रमाणात जागतिक व्यापारी वाहतूक केली जाऊ शकते, असा दावा डनलेवी यांनी केला. असे झाले तर पनामाच्या कालव्यातून होणारी वाहतूक कमी होईल व याचा सर्वाधिक लाभ अमेरिकेला होईल, असा डनलेवी यांचे म्हणणे आहे. याचा विचार करून अमेरिकेने आत्ताच धोरणात्मक पावले उचलावी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील डायनॅमिक्स बदलण्यासाठी पावले उचलावी, असे आवाहन डनलेवी यांनी केले.

चीन आीण रशिया यांनी आर्क्टिकवर आपला अधिकार सांगून या क्षेत्रासाठी स्वतंत्र नौदल व बांधकामाची निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचे गव्हर्नर डनलेवी यांनी लक्षात आणून दिले. सदर क्षेत्र चीन व रशियाच्या नियंत्रणाखाली येऊ नये, यासाठी अमेरिकेने धोरणे आखावी. तसेच येथील वाहतूकीच्या मार्गासाठीही अमेरिकेने आत्तापासूनच प्रयत्न करावे, असे डनलेवी यांनी सुचविले आहे.

दरम्यान, आर्क्टिक क्षेत्रात जगातील सर्वात मोठा न उघड झालेला इंधन आणि गॅसचा साठा असल्याचा दावा केला जातो. या खनिजसंपत्तीसाठी अमेरिका, रशिया, कॅनडा, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, आईसलँड आणि फिनलँड या देशांनी आपला अधिकार सांगितला आहे. अमेरिका, रशियाने याआधी सदर क्षेत्रात आपल्या विनाशिका व पाणबुड्या रवाना केल्या होत्या. पण गेल्या काही वर्षांपासून चीन देखील या क्षेत्राशी आपला संबंध असल्याचा दावा करू लागला आहे.

leave a reply