अमेरिकी विनाशिकेबाबत रशियाने केलेले दावे चुकीचे

- रशियाचे दावे अमेरिकी नौदलाने फेटाळले

अमेरिकी नौदलवॉशिंग्टन/मॉस्को – रशियाच्या युद्धनौकेने इशारे देऊन अमेरिकी युद्धनौकेला पिटाळल्याचा दावा अमेरिकी नौदलाने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. शुक्रवारी ‘सी ऑफ जपान’मध्ये गस्त घालणार्‍या ‘युएसएस चॅफी’ या विनाशिकेला रशियन हद्दीतून पिटाळल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली होती. या घटनेसंदर्भात इशारा देण्यासाठी रशियाने अमेरिकी लष्कराच्या प्रतिनिधींना समन्सही धाडले होते. शुक्रवारी घडलेल्या घटनेदरम्यान रशिया व चीनच्या नौदलामध्ये सराव सुरू होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी विनाशिकेची रशियाच्या हद्दीनजिकचा वावर लक्ष वेधून घेणारा ठरतो. अमेरिका व रशियाच्या नौदलाने ‘सी ऑफ जपान’मध्ये परस्परांसमोर येण्याची वर्षभरातील ही दुसरी घटना आहे.

गुरुवारपासून रशियाच्या पूर्वेकडील सागरी क्षेत्रात ‘रशिया-चीन जॉईंट सी २०२१’ हा नौदल सराव सुरू झाला आहे. सराव सुरू होण्यापूर्वी रशियाने ‘सी ऑफ जपान’च्या काही क्षेत्रात ‘नोटिस टू एअरमेन ऍण्ड मरिनर्स’ जारी केली होती. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अमेरिकेच्या ‘निमित्झ कॅरिअर ग्रुप’चा भाग असणारी प्रगत विनाशिका ‘युएसएस चॅफी’ गस्त घालत होती. ही गस्त सुरू असतानाच रशियाची युद्धनौका ‘ऍडमिरल ट्रिब्युट्स’ अमेरिकी विनाशिकेनजिक आली. अमेरिकेची विनाशिका रशियन हद्दीत येत असल्याचा दावा करून ‘रेडिओ वॉर्निंग’ जारी करण्यात आली.

मात्र अमेरिकी युद्धनौकेने मार्ग न बदलल्याने रशियन युद्धनौकेने पाठलाग करून तिला रशियन हद्दीपासून दूर पिटाळल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला. अमेरिकी विनाशिकेच्या हालचाली आंतरराष्ट्रीय नियम तसेच अमेरिका व रशियामध्ये झालेल्या करारांचा भंग असल्याचा ठपकाही रशियाने ठेवला. घटना अत्यंत गंभीर असल्याने रशियाने अमेरिकेच्या लष्करी प्रतिनिधींना समन्स बजावून ठाम भूमिका घेतल्याचा दावाही रशियाने केला आहे. पण रशियाचे दावे अमेरिकेने फेटाळून लावले आहेत. अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटने सदर घटनेबाबत स्वतंत्र निवेदन जारी केले.

‘दोन युद्धनौकांमध्ये घडलेल्या घटनांबाबत रशियाच्या संरक्षण विभागाने दिलेल माहिती चुकीची आहे. युएसएस चॅफी सी ऑफ जपानमध्ये नियमित गस्त मोहिमेवर होती. रशियाची विनाशिका अमेरिकी विनाशिकेपासून अवघ्या ६५ यार्डाच्या अंतरावर आली होती. दोन्ही युद्धनौकांमध्ये झालेली संदेशांची देवाणघेवाण सुरक्षित व व्यावसायिक स्तरावरील होती. अमेरिकी युद्धनौका आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मोहीम पार पाडत होती. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करून अमेरिकी यंत्रणा आपला वाहतुकीचा अधिकार बजावतील’, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

अमेरिकेने रशियाने दावा केलेल्या ‘पीटर द ग्रेट गल्फ’ या सागरी क्षेत्रानजिक युद्धनौका धाडण्याची वर्षभरातील ही दुसरी वेळ ठरली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेची प्रगत विनाशिका ‘युएसएस जॉन मॅक्कॅन’ने रशियन हद्दीनजिक गस्त घातली होती. त्यावेळीही रशियाने अमेरिकी विनाशिकेला पिटाळल्याचे दावे केले होते. यावेळी घडलेल्या घटनेदरम्यान सदर भागात रशिया व चीनमध्ये व्यापक नौदल सराव सुरू होता. त्यामुळे अमेरिकी युद्धनौकेने या भागात गस्त घालणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply