तालिबानला ‘टेरर लिस्ट’मधून वगळण्यावर रशियाचा विचार

‘टेरर लिस्ट’मॉस्को/काबुल – अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करणार्‍या तालिबानला ‘टेरर लिस्ट’ अर्थात दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्याची शक्यता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केली. याबाबत रशियाचा विचार करीत असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्तरावर देखील यासाठी प्रयत्न केले जावे, असे आवाहन रशियन राष्ट्राध्यक्षांनी केले. गेल्या आठवड्यात मॉस्को येथे पार पडलेल्या तालिबानबरोबरच्या बैठकीनंतर रशियाच्या भूमिकेत हा बदल झाल्याचे दिसते. तालिबानने याचे स्वागत केले आहे.

गेल्या आठवड्यात रशियाने अफगाणिस्तानातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी भारत, चीन, पाकिस्तान, इराण व मध्य आशियाई देशांची विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत तालिबानचे नेते देखील होते. या बैठकीचे सर्वच तपशील माध्यमांसमोर जाहीर करण्यात आले नव्हते. पण रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मॉस्कोमधील एका कार्यक्रमात बोलताना अफगाणिस्तानबाबत मोठी घोषणा केली.

तालिबानला दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्यावर रशिया विचार करीत असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले. अफगाणी जनतेसाठी तालिबानबरोबर वाटाघाटी करणे आवश्यक असल्याचे रशियन राष्ट्राध्यक्ष यांनी सांगितले. असे असले तरी रशिया अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याची घाई करणार नाही, अशी सावध भूमिका राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घेतली आहे. तालिबानने अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन करावे आणि या देशातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा रशियन राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली.

आयएस व इतर दहशतवादी संघटनांचा अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात वाढत असलेला प्रभाव आणि अमली पदार्थांची तस्करी ही मोठी आव्हाने असून तालिबानने याचे समाधान करावे, असे रशियन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले. दरम्यान, अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या घातपाती कारवायांमुळे ताजिकिस्तान व मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्याचा दावा रशिया करीत आहे. यासाठी रशियाने ताजिकिस्तानमधील आपल्या तळावर ३० प्रगत रणगाडे तैनात केले आहेत.

चीनचे परराष्ट्रमंत्री कतारमध्ये तालिबानी नेत्यांना भेटणार

बीजिंग – चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई सोमवार-मंगळवारी कतारच्या दौर्‍यावर असून ते तालिबानच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर यावेळी चर्चा होणार असल्याची माहिती चिनी मुखपत्राने दिली.

तालिबानला अफगाणिस्तानात चीनकडून मोठी गुंतवणूक हवी आहे. तर अफगाणिस्तानातील अब्जावधी डॉलर्सच्या खनिज संपत्तीवर चीनचा डोळा आहे. या पार्श्‍वभूमीवर, चीन व तालिबानमधील या भेटीवर जगभरातील प्रमुख देशांची नजर लागलेली आहे. तसेच अफगाणिस्तानातील ‘ईस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेंट-ईटीआयएम’ या दहशतवादी संघटनेकडून आपल्या सुरक्षेला धोका असल्याचा दावा चीन करीत आहे. तालिबानने या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी, अशी मागणी चीन सातत्याने करीत आहे.

leave a reply