‘नॉर्ड स्ट्रिम २’द्वारे रशिया युरोपला अतिरिक्त गॅसपुरवठा करू शकतो

- रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – ‘युरोपिय महासंघाच्या ऊर्जा धोरणांमुळे युरोपमध्ये निर्माण झालेली गॅस टंचाई आणि विक्रमी दरवाढीवर रशियाकडे उपाय आहे. ‘नॉर्ड स्ट्रिम २’ पाईपलाईनद्वारे रशिया युरोपिय देशांना अतिरिक्त व त्वरीत गॅसपुरवठा करू शकतो. पण यासाठी जर्मनीच्या होकाराची होकाराची आवश्यकता आहे’, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. ऊर्जा टंचाईच्या संकटात सापडलेल्या युरोपिय देशांसाठी रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिलेला हा प्रस्ताव अतिशय आकर्षक ठरतो.

‘नॉर्ड स्ट्रिम २’द्वारे रशिया युरोपला अतिरिक्त गॅसपुरवठा करू शकतो - रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनया महिन्याच्या सुरुवातीलाच रशियाने नॉर्ड स्ट्रिम २ पाईपलाईनमध्ये नैसर्गिक इंधनवायू अर्थात गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. युरोपमधील एनर्जी क्रायसिस व अमेरिका तसेच युरोपमधील काही देशांचा विरोध असतानाही रशियाने ही प्रक्रिया सुरू केल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. १,२३० किलोमीटर लांबीच्या या पाईपलाईनच्या माध्यमातून युरोपिय देशांना ११० अब्ज घनमीटरपर्यंत गॅसपुरवठा करण्याची ग्वाही रशियाने दिली होती.

नॉर्ड स्ट्रिम २ पाईपलाईन म्हणजे रशियासाठी धोरणात्मक विजय असल्याचा दावा करण्यात आला होता. तर बाल्टिक सागरी क्षेत्रातून जाणार्‍या या पाईपलाईनचा वापर रशियाने भूराजकीय उद्दिष्टे पूर्ण करणारे धोरणात्मक शस्त्र म्हणून करू नये, असा इशारा जर्मनीने काही दिवसांपूर्वी दिला होता. यानंतर संतापलेल्या रशियन राष्ट्राध्यक्षांनी जर्मनीचा हा आरोप फेटाळला होता. रशिया या पाईपलाईनचा वापर धोरणात्मक शस्त्र म्हणून करीत नसून युरोपिय देशांच्या इंधनटंचाईला सहाय्य म्हणून करीत असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले होते.

‘नॉर्ड स्ट्रिम २’द्वारे रशिया युरोपला अतिरिक्त गॅसपुरवठा करू शकतो - रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनगुरुवारी माध्यमांसमोर बोलताना रशियन राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा युरोपिय देशांना नॉर्ड स्ट्रिम २ पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्याची तयारी व्यक्त केली. ‘या पाईपलाईनच्या पहिल्या जोडणीत आधीच गॅस भरलेले असून जर्मनीच्या होकारानंतर त्वरीत हा गॅसपुरवठा सुरू होईल. आज परवानगी दिली तर उद्या १७.५ अब्ज क्युबिक मीटर इतक्या प्रमाणात गॅसपुरवठा सुरू होऊ शकतो. तर वर्ष अखेरीपर्यंत दुसर्‍या जोडणीत गॅसपुरवठा सुरू होईल’, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली. यामुळे युरोपिय देश ऊर्जा टंचाईचे संकटातून बाहेर पडू शकतात, याकडे रशियन राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले.

गुरुवार व शुक्रवार ब्रुसेल्स येथे नाटो सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक सुरू आहे. अशा परिस्थितीत, रशियन राष्ट्राध्यक्षांनी युरोपला हा प्रस्ताव दिल्याचे युरोपिय विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply