‘वेस्टर्न सहारा’बाबतच्या अमेरिकेच्या निर्णयावर रशियाची टीका

‘वेस्टर्न सहारा’मॉस्को/अल्जिअर्स – ‘वेस्टर्न सहारा’वरील मोरोक्कोच्या सार्वभौमत्त्वाला मान्यता देण्याचा अमेरिकेचा निर्णय एकतर्फी ठरतो. अमेरिकेची सदर घोषणा आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याची टीका रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री मिखाईल बोग्दानोव्ह यांनी केली. रशियापाठोपाठ मोरोक्कोचा शेजारी देश अल्जेरियाने देखील या निर्णयावर ताशेरे ओढून यामुळे सदर क्षेत्रात अस्थैर्य निर्माण होईल, असा इशारा दिला. तर मोरोक्कोमधील कट्टरपंथी गटाने इस्रायल आणि मोरोक्कोमधील सहकार्य आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि मोरोक्कोमधील सहकार्याची घोषणा केली. ही घोषणा करण्याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोरोक्कोचा वेस्टर्न सहारावर सार्वभौम अधिकार असल्याचे जाहीर केले. वेस्टर्न सहारावरील मोरोक्कोचा अधिकार कुणीही नाकारू शकत नसल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तर पुढच्या काही तासात मोरोक्कोतील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड फिशर यांनी वेस्टर्न सहाराचा समावेश असलेला संपूर्ण मोरोक्कोचा नकाशा प्रसिद्ध केला.

‘वेस्टर्न सहारा’

शेजारी देश अल्जेरियामध्ये मोठी लष्करी गुंतवणूक करणाऱ्या रशियाची अमेरिकेच्या या घोषणेवर तडक प्रतिक्रिया आली आहे. ‘वेस्टर्न सहाराबाबत निर्णय घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्त्वात आहे. अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी ठरतो व हे आंतरराष्ट्रीय नियामंचे उल्लंघन ठरते’, अशी टीका रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री बोग्दानोव्ह यांनी केली. त्याचबरोबर पॅलेस्टिनींचे हित पणाला लावून अरब देशांनी इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करू नये, असा सल्ला बोग्दानोव्ह यांनी दिला.

रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रझखरेदी करणाऱ्या आफ्रिकी देशांमध्ये अल्जेरियाचा समावेश होतो. त्याचबरोबर अल्जेरियाने रशियाकडून ‘एस-400’च्या खरेदीसाठी उत्सुकता दाखविली आहे.

दरम्यान, रशिया पाठोपाठ अल्जेरियाचे पंतप्रधान अब्देलअझिझ देराड यांनी वेस्टर्न सहारावरील मोरोक्कोचा सार्वभौम अधिकार आणि इस्रायल-मोरोक्को सहकार्याबाबत अमेरिकेने केलेल्या घोषणेवर नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर आफ्रिकी देशांच्या कारभारातील हा परदेशी हस्तक्षेप या क्षेत्रातील अस्थैर्य वाढविणार ठरतो. तसेच या सहकार्यामुळे इस्रायल अल्जेरियाच्या सीमेपर्यंत दाखल होईल, असा इशारा अल्जेरियाच्या पंतप्रधानांनी दिला.

leave a reply