‘ओपन स्काईज् ट्रिटी’तून अमेरिके पाठोपाठ रशियाचीही माघार

मॉस्को – युरोपसह सुमारे ३५ देशांचा सहभाग असलेल्या ‘ओपन स्काईज् ट्रिटी’तून (ओएसटी) रशियाने माघार घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेने सदर करारातून माघार घेतली होती. अमेरिकेची ही माघार सदर करार धोक्यात टाकणारी होती, अशी टीका रशियाने केली आहे. अमेरिकेपाठोपाठ रशियानेही या करारातून माघार घेतल्याने आपली सुरक्षा संकटात येईल, अशी चिंता युरोपिय देशांना सतावित आहे. फ्रान्सने रशियाला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे.

१९९२ साली ‘ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप’ (ओएससीई) या गटाच्या सदस्य देशांनी ‘ओएसटी’ हा करार पारित केला होता. अमेरिका, रशियासह युरोपमधील बहुतांश देशांचा सहभाग असलेल्या या ओएसटी करारानुसार, या देशांना एकमेकांच्या हवाईहद्दीत विमाने रवाना करून संवेदनशील ठिकाणांची टेहळणी करण्याची परवानगी आहे. या कराराचा वापर करून रशियाने गेल्या वर्षी अमेरिकेच्या ‘एरिया ५१’ या विवादित लष्करी तळाची टेहळणी केली होती.

पण रशिया ओएसटीचा विपर्यास करून इतर देशांच्या हवाई हद्दीत प्रवेश करीत असल्याची तक्रार अमेरिका गेल्या काही वर्षांपासून करीत होता. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या वर्षी मे महिन्यात विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या करारातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. तर २२ नोव्हेंबर रोजी अमेरिकेने या करारातून अधिकृतरित्या माघार घेतली. अमेरिकेच्या या भूमिकेवर रशियाने जोरदार टीका केली होती. तर शुक्रवारी रशियाच्या परराष्ट्रमंत्रालयाने सदर करारातून माघार घेताना युरोपिय देशांना लक्ष्य केले.

अमेरिकेच्या माघारीनंतर होणारे परिणाम कमी करण्यासाठी रशियाने युरोपिय देशांना काही प्रस्ताव दिले होते. युरोपिय देशांनी ‘फ्लाईट डाटा’ अमेरिकेला पुरवू नये, या प्रस्तावाचा यामध्ये समावेश होता. पण अमेरिकेच्या मित्रदेशांनी आपल्या प्रस्तावाचे समर्थन केले नाही. त्याचबरोबर या करारातून माघार घेऊनही अमेरिका युरोपिय मित्रदेशांकडून ‘फ्लाईट डाटा’ मिळवू शकतो. अमेरिका व मित्रदेशांचे हे धोरण आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची टीका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

दरम्यान, ज्यो बायडेन अमेरिकेची सूत्रे हाती घेण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशावेळी रशियाने सदर करारातून ही माघार घेतल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात अण्वस्त्रांची संख्या मर्यादित राखण्यासंबंधी अमेरिका व रशियात झालेला ‘न्यू स्टार्ट’ या कराराची मुदत देखील पूर्ण होत आहे.

leave a reply