रशियन राष्ट्राध्यक्षांकडून दोन नवे ‘डूम्सडे प्लेन्स’ सज्ज ठेवण्याचे आदेश

‘डूम्सडे प्लेन्स’मॉस्को – अणुयुद्धादरम्यान रशियन संरक्षणदलांच्या कमांडवर नियंत्रण राखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दोन नवी ‘डूम्सडे प्लेन्स’ सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रशियातील ‘व्होरोनेझ एव्हिएशन प्लँट’वर या विमानाची उभारणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी ‘डूम्सडे प्लेन्स’ ही चार इंजिन्स असणार्‍या ‘आयएल 96-400एम’ या प्रवासी विमानांवर आधारित असतील, असे सांगण्यात येते.

अणुयुद्ध किंवा इतर भयावह आपत्तीमध्ये जमिनीवरील संरक्षणदलांची कमांड उद्ध्वस्त झाल्यास संरक्षणदलाची कमांड हाताळण्याची यंत्रणा असणार्‍या विमानांना ‘डूम्सडे प्लेन्स’ म्हणून ओळखण्यात येते. अमेरिका व रशिया या दोन्ही देशांकडे प्रत्येकी चार ‘डूम्सडे प्लेन्स’ असल्याचे सांगण्यात येते. रशियाकडे असणारी ‘डूम्सडे प्लेन्स’ 1970-80च्या दशकातील असून ‘आयएल-80’ या प्रवासी विमानांवर आधारलेली आहेत.

‘डूम्सडे प्लेन्स’सध्या रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. युक्रेन, बेलारुस व सायबरहल्ल्यांच्या मुद्यावरून हा तणाव सातत्याने चिघळताना दिसत आहे. अमेरिका व रशियातील अण्वस्त्रांसंदर्भातील ‘आयएनएफ ट्रिटी’मधून दोन्ही देशांनी माघार घेतली आहे. त्याचवेळी नाटोचा युरोपातील विस्तार व युद्धसरावांमुळे रशिया चिंतित असून संरक्षणक्षमता वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षात रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसह नवी अण्वस्त्रे विकसित करण्यावर भर दिला आहे.

रशियाने एक पूर्ण शहर उद्ध्वस्त करण्याची क्षमता असणारे ‘डूम्सडे ड्रोन’ तसेच ‘डूम्सडे मिसाईल’ विकसित केल्याच्या बातम्याही गेल्या वर्षी प्रसिद्ध झाल्या होत्या. आता नव्या ‘डूम्सडे प्लेन्स’ची उभारणी त्यातीलच पुढचा टप्पा असल्याचे दिसत आहे. नव्या ‘डूम्सडे प्लेन्स’मध्ये सहा हजार किलोमीटर्स परिसरातील अण्वस्त्रांना प्रक्षेपित करण्याचे आदेश देण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात येते. सध्याच्या ‘डूम्सडे प्लेन्स’पेक्षा ही क्षमता दुप्पट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या वर्षी रशियाच्या एका डूम्सडे प्लेनमधील दूरसंचार यंत्रणा चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. या घटनेने रशियात चांगलीच खळबळ उडाली होती.

leave a reply