इस्रायलचे हल्ले परतविण्यासाठी सिरियाच्या गोलानमध्ये रशियाची तैनाती

बैरूत – यापुढे इस्रायलकडून सिरियाच्या गोलान भागात होणाऱ्या हल्ल्यांना रशियाचे लष्कर प्रत्युत्तर देणार आहे. यासाठी रशियाने सदर भागात सैन्य तैनाती केल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायली तसेच अरब माध्यमांनी रशियन वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही बातमी दिली. सिरियाच्या या भागात इराणचे जवान व हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या धोकादायक हालचाली सुरू असल्याचे सांगून इस्रायलने हल्ले चढविले होते.

तैनाती

इस्रायलच्या सीमारेषेजवळ असलेल्या सिरियाच्या गोलानमधील ‘कुनित्रा’ या भागात रशिया आणि सिरियाचे लष्कर संयुक्त गस्त घालत आहेत. रशियन लष्कराच्या कमांडरने रशियन वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत ही माहिती दिली. “इस्रायल आणि सिरियाला वेगळे करणाऱ्या ‘ब्राव्हो लाईन’ जवळ रशियन लष्कर सिरियन जवानांना सहाय्य करीत आहेत. या भागात रशिया व सिरियन जवान युद्धसराव करीत आहे. तसेच स्थानिकांना सुरक्षित जागी हलविण्याच्या कामातही रशियन लष्कर गुंतले आहे. या व्यतिरिक्त सदर भागावरील हल्ले परतविण्याची जबाबदारी देखील रशियन लष्करावर आहे’, असे संबंधित रशियन कमांडरने वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

इस्रायली तसेच अरब वृत्तसंस्थेने रशियन वृत्तसंस्थेच्या हवाल्याने सदर बातमी प्रसिद्ध केली. तर बल्गेरियन लष्कराशी संबंधित संकेतस्थळाने रशिया सिरियाच्या गोलान भागात मोठी तैनाती करणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी बल्गेरियन संकेतस्थळाने रशियन संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाला दिला. सिरियाच्या गोलानमधील या सैन्यतैनातीच्या बातम्यांवर इस्रायलची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. कारण याआधी सिरियाच्या गोलानमधील लष्करी हालचालींवरुन इस्रायलने सिरियातील अस्साद राजवटीला इशारा दिला होता.

गेल्याच महिन्यात इस्रायली लष्कराने सिरियाच्या गोलान भागात हवाई हल्ले चढविले होते. इराणचे जवान आणि हिजबुल्लाहचे दहशतवादी आपल्या सीमेवर स्फोटके पेरत असताना ही कारवाई केल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले होते. तसेच या स्फोटकांचे फोटोग्राफ्स आणि हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा व्हिडिओ इस्रायली लष्कराने प्रसिद्ध केला होता. यानंतर इस्रायलने सिरियातील अस्साद राजवटीला स्पष्ट शब्दात खडसावले होते. इस्रायलच्या गोलान सीमेजवळच्या सिरियातील सीमाभागात इराणचे जवान किंवा हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या तर त्यासाठी अस्साद राजवट जबाबदार असेल, असा इशारा इस्रायलने दिला होता.

तर दोन दिवसांपूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्या स्वतंत्र होईपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार असल्याची घोषणा केली होती. या संघर्षासाठी सिरियन लष्कराला इराणचे पूर्ण समर्थन मिळेल, असे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले होते. त्यानंतर इस्रायलकडून सिरियाच्या गोलानमधील हल्ल्यांची शक्यता वाढली होती. अशा परिस्थितीत रशियाची गोलानमध्ये लष्कर तैनाती लक्षवेधी ठरत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ इस्रायल भेटीवर असताना त्यांनी गोलान टेकड्यांना भेट दिली होती. त्यांच्या या भेटीवर रशियाने तीव्र आक्षेप घेऊन पॉम्पिओ यांच्या भेटीने या क्षेत्रातील तणाव वाढेल, अशी टीका रशियाने केली होती.

leave a reply