सौदीने हौथी बंडखोरांचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले भेदले

बॅलेस्टिकरियाध/दुबई – येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढविले आहेत. हौथींनी सौदीची राजधानी रियाधवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. तर गझान शहरावर स्फोटकांनी भरलेले ड्रोन्सचे हल्ले चढविले. सौदीच्या लष्कराने पॅट्रियॉट यंत्रणा कार्यान्वित करून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे सौदीच्या लष्कराने स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या आठवड्याभरात इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी या क्षेत्रात अमेरिका व मित्रदेशांच्या हितसंबंधांवर चढविलेला हा तिसरा हल्ला ठरतो.

शनिवारी रात्री सौदीच्या ‘अल-अखबारिया’ वृत्तवाहिनीने रियाधवरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये रियाधच्या हवाई क्षेत्राजवळ दाखल झालेल्या दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या सौदीच्या पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणेने ठिकर्‍या उडवल्या. या हल्ल्यात जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे सौदीच्या वृत्तवाहिनीने सांगितले. रियाधमध्ये ‘फॉर्म्युला ई चॅम्पियनशीप’ स्पर्धा सुरू असताना हा हल्ला झाला. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या स्पर्धेला उपस्थित होते. त्यामुळे हौथींचा मोठा डाव फसल्याचा दावा सौदीची माध्यमे करीत आहेत.

बॅलेस्टिकरियाधवरील हल्ला फसल्यानंतर हौथी बंडखोरांनी सौदीच्या नैऋत्येकडील गझान शहरावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन्सचे हल्ले चढविले. या हल्ल्यातही कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. पण आत्मविश्‍वास वाढलेल्या हौथी बंडखोरांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवून मोठी चूक केल्याचा इशारा सौदीच्या लष्कराने दिला. या हल्ल्यांवर हौथी बंडखोरांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून हौथींनी येमेन तसेच सौदीवरील आपले हल्ले वाढविले आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिकेने सौदीतील आपल्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा जारी केला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात इराण किंवा इराणसंलग्न दहशतवाद्यांनी अमेरिका व मित्रदेशांच्या हितसंबंधांना लक्ष्य करणारा हा तिसरा हल्ला ठरतो. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला इराकमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ इराणसंलग्न दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ले चढविले होते. तर दोन दिवसांपूर्वी ओमानच्या आखातातून प्रवास करणार्‍या इस्रायलच्या मालवाहू जहाजात गूढ स्फोट झाला. या स्फोटामागे इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स असल्याचा संशय व्यक्त केला जातो. तर त्यानंतर इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी सौदीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले.

leave a reply