जॉर्डनचे राजे व इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची गोपनीय भेट

भेट

जेरूसलेम – इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी जॉर्डनचा छुपा दौरा करून राजे अब्दुल्ला यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. काही तासांपूर्वीच इस्रायल, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई) व बाहरिन या चार देशांमध्ये स्वतंत्र लष्करी आघाडी उघडण्याबाबत चर्चा झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर गांत्झ आणि राजे अब्दुल्ला यांच्या भेटीला फार मोठे सामरिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

इस्रायलच्या वर्तमानपत्राने संरक्षणमंत्री गांत्झ आणि राजे अब्दुल्ला यांच्यातील भेटीची बातमी प्रसिद्ध केली. पण ही भेट कधी झाली, ते उघड केलेले नाही. इस्रायलमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भेटसंरक्षणमंत्री गांत्झ यांनी जॉर्डनच्या राजांची भेट घेतल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला. काही दिवसांपूर्वी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री अश्केनाझी यांनी देखील जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती, याकडेही सदर वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

इराणपासून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, इस्रायल तसेच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई) व बाहरिन एकत्र येत आहेत. इराणच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायल आणि सौदी व अरब मित्रदेशांमध्ये संयुक्त लष्करी आघाडी उघडण्यासाठी चर्चा सुरू असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वीच इस्रायलच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली होती.

leave a reply