‘पुलवामा’पेक्षा भयंकर दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षादलांनी उधळला

नवी दिल्ली – गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये ‘पुलवामा’पेक्षा भयंकर दहशतवादी हल्ल्या घडविण्याचा कट भारतीय सुरक्षादलांनी उधळला. सीआरपीएफ’च्या ४०० जवानांना घेऊन जाणाऱ्या २० वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य करण्याची योजना ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ आणि ‘जैश-ए-मोहमद’च्या दहशतवाद्यांनी आखली होती. याकरीता स्फोटकाने भरलेले वाहन घेऊन जाणाऱ्या दहशतवाद्यांचा सुरक्षादलांनी थरारक पाठलाग केला. त्यामुळे पुलवामाच्या अयानगुंड भागात दहशतवाद्यांना हे स्फोटकाने भरलेले वाहन तेथेच सोडून पळ काढावा लागला. या वाहनात स्फोटकांची मात्रा ‘पुलवामा’च्या हल्ल्यात वापरण्यात आलेल्या स्फोटकांपेक्षाही कितीतरी अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. या कटात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सुरक्षादलांकडून कसून शोध घेतला जात आहे, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

‘हिजबुल’च्या रियाझ नायकूसह सुमारे ४० हून अधिक दहशतवादी गेल्या दोन महिन्यात जम्मू-काश्मीरमधील कारवाईत ठार झाले आहेत. यामुळे दहशतवादी संघटना अस्वस्थ आणि हताश आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी धडपडत आहेत. यासाठी ‘हिजबुल’ ‘लश्कर’ आणि ‘जैश’ सारख्या संघटनांनी हातमिळवणी केली आहे. या संघटना मोठ्या हल्ल्याचा कट आखत आहेत, असा इशारा काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी दिला होता.

बुधवारी यासंदर्भांत एक खबर सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षादलांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली. यावेळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांचा अमानसामाना झाला. नाकेबंदी दरम्यान एका संशयीत सॅन्ट्रो गाडीला थांबिवण्याचा इशारा सुरक्षादलांनी केला. मात्र यामध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी गाडी वळवून तेथून पळ काढला. दुसऱ्या नाकाबंदीच्या ठिकणावरही हवेत गोळीबार करून इशारा दिल्यानंतरही दहशतवाद्यांनी तेथूनही निसटण्याचा प्रयत्न केला. या वाहनाचा सतत पाठलाग करण्यात येत होता. अखेर अयानगुंड भागात आपली गाडी काळोखात सोडून दहशतवाद्यांनी पोबारा केला. पाठलाग करणाऱ्या पथकाने रस्त्यात सोडलेल्या या गाडीची ओळख पटल्यानंतर पुढील मदत येईपर्यंत तेथेच सकाळपर्यँत वाट पहिली, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली.

या मोटारीत मोठ्या प्रमाणावर स्फोटके होती. ही स्फोटके निकामी करताना स्फोट होण्याचा धोका होता. त्यामुळे सुरक्षित पद्धतीने स्फोटकांसह हे वाहनच उडवून देण्यात आले, अशी माहितीही पोलिसांच्या वतीने देण्यात आली. या वाहनात २५ ते ३० किलो स्फोटके असावी असा अंदाज होता. मात्र स्फोटाच्या तीव्रतेवरून वाहनात किमान ४५ किलो स्फोटके असावीत अशी शक्यता तज्ज्ञ वर्तविता आहेत. तसेच दहशतवाद्यांनी आयईडी तयार करण्यासाठी अमोनियम नायट्रेड आणि आरडीएक्सचा वापर केला होता. वाहनात या स्फोटकांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली होती की सीआरपीएफ ताफ्यावर हे वाहन आदळले असते, तर पुलवामापेक्षा कितीतरी भयंकर प्रमाणात हानी झाली असती, असे सांगितले जाते.

या आत्मघाती हल्ल्याच्या कटाप्रकरणी आतापर्यंत तीन जणांची ओळख पटली आहे. यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी वालीद उर्फ मुसा उर्फ इदलीसचा समावेश असून तो सुरक्षादलांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे. काश्मीर खोऱ्यात २०१५ पासून सक्रिय असलेला वालिद आयइडी बनविण्यात तज्ज्ञ मानला जातो. वालिदबरोबर ‘हिजबुल’चा एक पाकिस्तानी कमांडर फौजी भाईही या कटात सामील असून आदिल नावाच्या एका दहशतवाद्यांचे नावही समोर येत आहे. वाहनावर एका दुचाकींचा नंबर लावण्यात आला होता. ही बाईक ताब्यात घेण्यात आली आहे. सुरक्षादल या दहशतवाद्यांचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, १४ फेब्रुवारी २०१९ साली दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशवादी तळावर हवाई हल्ले केले होते. तसेच या नंतर जम्मू-काश्मीरमधील दहशवादविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली होती. यामध्ये काश्मीरमध्ये कार्यरत सर्वच दहशवादी संघटना कमकुवत झाल्या असून आता या संघटना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडत आहेत. रियाझ नायकूला भारतीय सुरक्षादलांनी ठार केल्यावर सीमेपलीकडून ‘हिजबुल’चा प्रमुख सय्यद सल्लाहुद्दीनने ‘इस वक्त दुश्मन का पलडा भारी है’, अशी प्रतिक्रिया दिली होती. सल्लाहुद्दीनची ही प्रतिक्रिया काश्मीरमधील दहशतवादी संघटनांची अवस्था काय आहे, याचे स्पष्ट संकेत देते.

leave a reply