पाकिस्तानच्या कराचीमध्ये चिनी नागरिकांवर गोळीबार

- चीनची अतिशय सावध प्रतिक्रिया

कराची – चीनच्या नऊ इंजिनिअर्सचा बळी घेणार्‍या पाकिस्तानच्या दासू धरणानजिकच्या हल्ल्याला दोन आठवडे उलटत नाही तोच, कराचीमध्ये चिनी नागरिकांवर गोळीबार झाला आहे. यात चीनचे दोन नागरिक जखमी झाले. ही स्वतंत्र घटना असल्याचे सांगून चीनने त्यावर सारवासारव केली आहे खरी. पण या निमित्ताने पाकिस्तानात सक्रीय असलेल्या चीनच्या नागरिकांची सुरक्षा हा अत्यंत संवेदनशील मुद्दा बनल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आपल्या सुरक्षेसाठी पाकिस्तानातील चिनी नागरिकाने सोबत एके-47 सायफल बाळगल्याचे व्हिडिओज् प्रसिद्ध झाले होते.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये चिनी नागरिकांवर गोळीबार - चीनची अतिशय सावध प्रतिक्रियाबुधवारी कराचीच्या औद्योगिक वसाहत असलेल्या भागात हा हल्ला झाला. चीनचे दोन नागरिक प्रवास करीत असलेल्या मोटारीवर गोळीबार करून अज्ञात मोटरसायलस्वार पसार झाले. यात हे चिनी नागरिक जखमी झाले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही. पण कराची पोलिसांनी यासाठी चीनच्या नागरिकांनाच जबाबदार धरले. सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी व नियम या दोघांनी पाळले नाहीत, असा ठपका कराचीच्या पोलिसांनी ठेवला. तर चीनने ही वेगळी घटना असल्याचे सांगून यावर जहाल प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

आपले नऊ इंजिनिअर्स ठार झाल्यानंतर, चीनने पाकिस्तानला धारेवर धरले होते. पाकिस्तानात सक्रीय असलेल्या चिनी नागरिकांची सुरक्षा करणे जमत नसेल, तर पाकिस्तानमध्ये चीन आपले जवान व क्षेपणास्त्रेही तैनात करायला तयार आहे, असे चीनने बजावले होते. इतकेच नाही तर या प्रकरणी जाब विचारण्यासाठी चीनने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी व आयएसआयचे प्रमुख फैज हमिद यांना बीजिंगमध्ये बोलावून घेतले होते. त्यामुळे दासू धरणप्रकल्पाजवळ 14 जुलै रोजी झालेला झालेला हा हल्ला पाकिस्तान व चीनच्या संबंधांवर विपरित परिणाम करणारा असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

त्या पार्श्‍वभूमीवर, कराचीमधील हल्ल्यानंतर चीनने दिलेली थंड प्रतिक्रिया लक्षवेधी ठरते. सध्या पाकिस्तानात चीनच्या गुंतवणुकीविरोधात वातावरण तापले असून चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पाच्या अंतर्गत पाकिस्तानात गुंतवणूक केलेली आहे की पाकिस्तानला चढ्या व्याजदराने कर्ज देऊन हे प्रकल्प सुरू केले आहेत, अशी विचारणा होत आहे. या प्रकल्पांमधून चीनला प्रचंड लाभ मिळेल, पण पाकिस्तानच्या हाती काही न लागता उलट डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे राहतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

त्याचवेळी विविध प्रकल्पांच्या अंतर्गत पाकिस्तानात काम करीत असलेले चिनी नागरिक स्थानिकांवर अरेरावी करीत असल्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहे. चीनने बलोचिस्तानात गुंतवणूक करू नये, असा इशारा या प्रांतातल्या बंडखोरांनी याआधीच दिला होता. त्यामुळे पाकिस्तानात चीन अप्रिय बनत चालला असून चिनी नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांमागे स्थानिक पातळीवरील असंतोष असण्याचीही दाट शक्यता आहे.

leave a reply