चीन-रशियादरम्यान इंधनवाहिनी प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

इंधनवाहिनीबीजिंग/मॉस्को – चीन व रशियादरम्यान उभारण्यात येणाऱ्या नैसर्गिक इंधनवायू पुरविणाऱ्या पाईपलाईनचा महत्त्वाचा टप्पा सक्रिय झाल्याची माहिती चीनने दिली आहे. या माध्यमातून रशियाच्या ‘पॉवर ऑफ सैबैरिया’ इंधनवाहिनीतील नैसर्गिक इंधनवायू उत्तर चीनमधील बीजिंग व हेबेई भागाला पुरविण्यात येणार आहे. या इंधनवाहिनीमुळे रशियाकडून चीनला पुरविण्यात येणाऱ्या नैसर्गिक इंधनाच्या पुरवठ्यात 2.7 कोटी घनमीटर इंधनाची भर पडणार आहे.

सहा वर्षांपूर्वी रशिया व चीनमध्ये 30 वर्षांसाठीच्या महत्त्वाकांक्षी इंधन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. हा करार सुमारे 400 अब्ज डॉलर्सचा असून, 2015 साली दोन देशांमध्ये इंधनवाहिनीच्या उभारणीला सुरुवात झाली होती. ‘पॉवर ऑफ सैबेरिया’ नावाने ओळखण्यात येणाऱ्या या इंधनवाहिनीच्या माध्यमातून रशिया चीनला दरवर्षी तब्बल दोन ट्रिलियन घनफूट इंधनवायूचा पुरवठा करणार आहे. या इंधनवाहिनीचे ‘ईस्ट रुट’ व ‘वेस्टर्न रुट’ असे दोन टप्पे आहेत.

इंधनवाहिनी

गुरुवारी पूर्ण झालेला टप्पा ‘ईस्ट रुट’चा भाग असून त्यामुळे चीनची राजधानी बीजिंगसह हेबेई प्रांताला अतिरिक्त इंधनपुरवठा शक्य होणार आहे. गेल्या वर्षी याच इंधनवाहिनीचा उत्तरेकडील टप्पा पूर्ण झाल्याची माहिती चीनकडून देण्यात आली होती. तर यावर्षी जुलै महिन्यात ‘पॉवर ऑफ सैबेरिया’ इंधनवाहिनी शांघाय शहरापर्यंत वाढविणाऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या काही वर्षात रशिया व चीनमधील संबंध अधिक मजबूत झाले असून त्यात इंधन सहकार्य हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. रशियाने त्याच्यावर पाश्‍चात्य देशांनी टाकलेल्या निर्बंधांचा मुकाबला करण्यासाठी चीनबरोबर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला होता. तर चीनने तेल व कोळशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियाकडून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक इंधन आयात करण्यास सुरुवात केली होती. याचाच वापर चीनने आपले चलन युआन अधिक भक्कम करण्यासाठीही केल्याचे समोर आले आहे.

leave a reply