बंडखोर संघटनांच्या धमकीनंतर म्यानमारमध्ये गृहयुद्ध भडकण्याचे संकेत

- बंडखोरांकडून लोकशाहीवादी आंदोलनाला समर्थन

नेप्यितौ – म्यानमारचे लष्कर उघडपणे लोकशाहीवादी आंदोलकांचे हत्याकांड घडवित असताना या देशातील बंडखोर संघटनांनी लष्कराविरोधात नव्या संघर्षाची धमकी दिली आहे. लष्कराने निष्पाप नागरिकांविरोधातील हिंसाचार थांबविला नाही, तर आम्ही आंदोलकांच्या सोबत राहून लष्करावर हल्ले चढवू, असा इशारा चार प्रमुख बंडखोर संघटनांनी दिला. या इशार्‍यामुळे म्यानमारमध्ये पुन्हा एकदा तीव्र गृहयुद्ध भडकण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, म्यानमारच्या लष्कराकडून सुरू असलेल्या पाशवी कारवाईचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत असून, अमेरिका व जपानसह ‘आसियन’ देशांनी नव्या कारवाईची घोषणा केली आहे.

म्यानमारच्या लष्कराकडून गेले काही दिवस सातत्याने लोकशाहीवादी आंदोलकांविरोधात कारवाई सुरू आहे. म्यानमारमधील स्वयंसेवी गटांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यात लष्करी कारवाईत तब्बल ५५० जणांचा बळी गेला असून हजारो जण जखमी झाले आहेत. सुमारे तीन हजार जणांना तुरुंगात टाकण्यात आले असून त्यात राजकीय कार्यकर्त्यांसह पत्रकारांचाही समावेश आहे. लष्कराकडून सुरू असणार्‍या या कारवाईनंतरही लोकशाहीवादी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून दररोज लाखो नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शनांमध्ये सहभागी होत आहेत.

लष्कराविरोधात सुरू असणार्‍या या आंदोलनात आता म्यानमारमधील बंडखोर संघटनांनीही उडी घेतली आहे. म्यानमारमध्ये अनेक वांशिक गट गेल्या काही दशकांपासून स्वायत्ततेसाठी सशस्त्र संघर्ष करीत आहेत. काही काळापूर्वी म्यानमारच्या लष्कराने या गटांबरोबर संघर्षबंदी जाहीर केली होती. तसेच ‘आराकान आर्मी’सारख्या गटाला दहशतवादी संघटनांच्या यादीतूनही वगळले होते. त्यामुळे या आघाडीवर म्यानमारच्या लष्कराला शांतता निर्माण करण्यात यश आल्याचे मानले जात होते. मात्र लोकशाहीवादी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ही आघाडी पुन्हा अस्थिर होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

लोकशाहीवादी आंदोलन चिरडण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान म्यानमारच्या लष्कराने कॅरेन स्टेटमध्ये हवाईहल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांमुळे लष्कराबरोबरील संघर्षबंदी संपुष्टात आल्याचे ‘कॅरेन नॅशनल युनियन’ या बंडखोर संघटनेने जाहीर केले आहे. या संघटनेने गेल्या आठवड्यापासून कॅरेन स्टेट या प्रांतातील पोलिस चौक्या तसेच लष्करी ठाण्यांवर हल्ले सुरू केल्याचेही समोर येत आहे. आपल्या भागात लष्कराने निरपराध नागरिकांवर कारवाई केल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा ‘कॅरेन नॅशनल युनियन’ने दिला आहे.

त्यापाठोपाठ म्यानमारमधील तीन आघाडीच्या बंडखोर संघटनांनी लष्कराला हल्ल्यांची धमकी देणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘जर लष्कराने हिंसाचार न थांबविता निरपराध नागरिकांना मारणे सुरू ठेवले तर आम्ही निदर्शकांना साथ देऊन प्रतिहल्ले चढवू’, अशी धमकी बंडखोर संघटनांनी दिली आहे. धमकी देणार्‍या संघटनांमध्ये ‘तांग नॅशनल लिबरेशन आर्मी’, ‘म्यानमार नॅशनॅलिटिज् डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मी’ आणि ‘आराकान आर्मी’चा समावेश आहे. जर या गटांनी पुन्हा सशस्त्र संघर्षाला सुरुवात केली तर म्यानमारमध्ये भीषण गृहयुद्ध भडकेल, असे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गटाने बजावले आहे.

दरम्यान, म्यानमारच्या लष्कराकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने म्यानमारला देण्यात येणारे लष्करी सहकार्य थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी म्यानमारमधील काही राजनैतिक अधिकारी व कर्मचार्‍यांनाही माघारी बोलाविण्यात आले आहे. तर जपानने म्यानमारला देण्यात येणारे नवे अर्थसहाय्य रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आसियन’चे सदस्य देश असणार्‍या इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया व थायलंडनेही म्यानमारच्या लष्कराचा तीव्र निषेध करणारे निवेदन प्रसिद्ध केले असून, कारवाईचे संकेत दिले आहेत.

leave a reply