वादग्रस्त धोरणांवर परखड टीका करणार्‍या अमेरिकी अधिकार्‍याची ‘स्पेस कमांड’मधून हकालपट्टी

‘स्पेस कमांड’वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षणदलांमध्ये देण्यात येणारे प्रशिक्षण हे वादग्रस्त वांशिक सिद्धांत (क्रिटिकल रेस थिअरी) व मार्क्सवादाचा भाग असल्याची टीका करणार्‍या लेफ्टनंट कर्नल मॅथ्यू लॉह्मेअर यांची ‘स्पेस फोर्स’मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त लेफ्टनंट कर्नल लॉह्मेअर कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केलेली वक्तव्ये नेतृत्त्वक्षमता व विश्‍वासाचा भंग करणारी असल्याने त्यांना सेवेतून मुक्त करण्यात येत आहे, असे स्पेस फोर्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. लेफ्टनंट कर्नल मॅथ्यू लॉह्मेअर हे बकले एअरफोर्स बेसवरील ‘११ स्पेस वॉर्निंग स्क्वाड्रन’चे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

लेफ्टनंट कर्नल मॅथ्यू लॉह्मेअर यांचे, ‘इररेझिस्टेबरल रिव्होल्युशन: मार्क्सिझम गोल ऑफ कॉन्क्वेस्ट ऍण्ड द अनमेकिंग ऑफ द अमेरिकन मिलिटरी’ नावाचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर ‘निओ-मार्क्सिस्ट अजेंडा’, ‘ब्लॅक लाईव्हज् मुव्हमेंट’, ‘अँटी रेसिझम’, ‘पोस्टमॉर्डनिझम’ व ‘पॉलिटिकल करेक्टनेस’ यांचा होणारा परिणाम मांडण्यात आला आहे. लेफ्टनंट कर्नल लॉह्मेअर यांनी पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी संरक्षण विभागाची परवानगीही घेतली होती, असे सांगण्यात येते.

या पुस्तकासंदर्भात बोलण्यासाठी लेफ्टनंट कर्नल लॉह्मेअर ‘इर्न्फोमेशन ऑपरेशन’ नावाच्या ‘पॉडकास्ट’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी सूत्रधार एल. टॉड वूड यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘विविधता, सर्वसमावेशकता, समानता आणि आम्हाला लष्करात मिळणारे प्रशिक्षण या सर्व गोष्टींचे मूळ वादग्रस्त वंशविषयक सिद्धांतात आहे. हा सिद्धांत मार्क्सवादाचा भाग आहे’, असा दावा लेफ्टनंट कर्नल लॉह्मेअर यांनी केला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांच्या अजेंड्यावरही टीका केली.

जानेवारी महिन्यात कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचारानंतर संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी एक बैठक घेऊन संरक्षणदलातील उजव्या विचारसणीबाबत चिंता व्यक्त केली होती. अमेरिकी संरक्षणदलातील सर्वांना वंशभेद, द्वेष व छळवणुकीपासून मुक्त असणारे वातावरण मिळविण्याचा अधिकार आहे, असे सांगून त्यांनी अमेरिकी संरक्षणदलांसाठी ‘स्टँड डाऊन’चे आदेशही दिले होते. यावेळी देण्यात आलेल्या पुस्तिकेत फक्त कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचाराचा उल्लख होता; पण ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलनात झालेला हिंसाचार व असंतोषाचा उल्लेख नव्हता, या विरोधाभासाकडे लॉह्मेअर यांनी लक्ष वेधले.

‘संरक्षणमंत्री ऑस्टिन वाईट आहेत, असे मला म्हणायचे नाही. पण विविधता व समावेशकतेच्या नावाखाली जो अजेंडा राबविला जात आहे, त्याने अमेरिकेच्या संरक्षणदलात एकजुटीऐवजी फूट पडेल. संरक्षणमंत्री ऑस्टिन व संरक्षणदलाचा भाग असणार्‍या प्रत्येक सदस्याने याची जाणीव ठेवायला हवी’, या शब्दात लॉह्मेअर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. लेफ्टनंट कर्नल मॅथ्यू लॉह्मेअर यांचे पुस्तक व त्यांनी केलेली वक्तव्ये यामुळे सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाकडून राबविण्यात येणार्‍या ढोंगी डाव्या विचारसरणीच्या प्रसाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बायडेन यांच्या निवडीपासूनच अमेरिकेतील विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर अतिरेकी उदारमतवाद व समाजवादी विचारसरणीच्या मुद्यावरून टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील १२४ माजी लष्करी अधिकार्‍यांनी लिहिलेल्या पत्रातही, समाजवाद व मार्क्सवाद यांच्याविरोधात संवैधानिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

leave a reply