श्रीनगर-शारजा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू

श्रीनगर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर दौर्‍यात श्रीनगर-शारजा या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा शुभारंभ झाला. नुकतेच भारताने संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दुबाई प्रशासनाबरोबर जम्मू-काश्मीरच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीसंदर्भात मोठा करार केला होता. त्यानंतर आता श्रीनगर-शारजा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होत आहे. भारत आणि दुबई प्रशासनामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झालेल्या कारारनंतर पाकिस्तान खूपच अस्वस्थ झाल्याचे पहायला मिळाले होते. पाकिस्ताने भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी ही भारताला जम्मू-काश्मीरच्या आघाडीवर मिळालेले मोठे यश असल्याचे म्हटले होते. तसेच पाकिस्तानची परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी असून आता ओआयसी देशही भारताच्या बाजूने उभे असल्याचे यातून स्पष्ट दिसते, असेही बसीत म्हणाले होते. या पार्श्‍वभूमीवर युएईच्या शारजापर्यंत सुरू झालेल्या या विमानसेवेचे महत्त्व आणखी वाढते.

श्रीनगर-शारजा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरूजम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती स्थिरस्थावर होत असून विविध देश येथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. युएईतील अनेक कंपन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गुतवणूक करण्याच्या इच्छा व्यक्त केली आहे, असे चार दिवसांपूर्वी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल भारत-युएईमध्ये करारानंतर म्हणाले होते. त्यानंतर आता श्रीनगर-शारजा विमानसेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे जम्मू-काश्मीर आता अंतरराष्ट्रीय पातळीवर थेट जोडले जाणार आहे. तसेच याद्वारे होणार्‍या मालवाहतूकीमुळे जम्मू-काश्मीरमधील शेती व इतर मालाला अंतरराष्ट्रीय बाजारपेठही उपलब्ध होणार आहे. गो एअर ही कंपनीने ही विमानसेवा सुरू केली असून आठवड्याला चार विमाने श्रीनगर ते शारजादरम्यान उड्डाण करणार आहेत. यामुळे व्यापाराबरोबर पर्यटनही वाढेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या मुस्लीम देशांच्या संघटनेचा युएई प्रमुख व प्रभावी सदस्य आहे. ओआयसीने जम्मू-काश्मीर मुद्यांवर भारतावर टीका करावी, अशी मागणी सतत पाकिस्तान करीत आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ओआयसीमध्ये जम्मू-काश्मीरमुद्यांवर पाकिस्तानला प्रतिसाद मिळत नसल्याने पाकिस्तानात खूप अस्वस्थता होती. ओआयसी देश भारताच्या विरोधात बोलण्यास तयार नसून या संघटनेवरील पाकिस्तानचा एकेकाळचा प्रभाव संपला असल्याचे पाकिस्तानातीलच विश्‍लेषक सांगत आहेत. भातर आणि युएईमध्ये जम्मू-काश्मीरमधील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात झालेल्या करारानंतर पाकिस्तानात ही अस्वस्थता आणखीनच वाढली आहे. पंतप्रधान इम्रान खान सरकारच्या परराष्ट्र धोरणावर पाकिस्तानात यानंतर प्रचंड टीका झाली आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये या बातमीने खळबळ माजविली आहे. त्यानंतर अवघ्या चार दिवसातच श्रीनगर-शारजा विमान सेवा सुरू होत आहे.

leave a reply