अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी ‘ड्युरांड लाईन’मधला दहशतवाद रोखा

- सुरक्षा परिषदेत भारताचा पाकिस्तानवर प्रहार

न्यूयॉर्क – ‘दहशतवाद कोणत्याही स्वरुपात असला तरी त्याची गय करून चालणार नाही. अफगाणिस्तान किंवा त्या क्षेत्रातील कोणत्याही देशाला धोका असणाऱ्या दहशतवाद्यांना इतर कोणीही सुरक्षित आश्रय देत नाही, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे ठरते. जर कोणी तसे करीत असेल तर त्यांना त्यासाठी जबाबदार धरुन कारवाई व्हायलाच हवी’, अशा खरमरीत शब्दात भारताने सुरक्षा परिषदेत पाकिस्तानची खरडपट्टी काढली. अफगाणिस्तानात होणाऱ्या हल्ल्यांमागे पाकिस्तानच सूत्रधार असल्याचा ठपका भारताने ठेवला असून,दोन देशांमधील सीमेवर बिनधास्तपणे वावरणारे दहशतवाद्यांचे लोंढे थांबायलाच हवेत, असे भारताने फटकारले आहे.

अफगाणिस्तानात गेलेकाही दिवस सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून त्यामागे पाकिस्तानच असल्याचे समोर येत आहे. भारतातही दहशतवादी हल्ल्यांचे मोठे कट उधळण्यात आले आहेत. यामागे असलेले पाकिस्तानी कनेक्शनही उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा पाकिस्तानची चांगलीच हजेरी घेतल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अफगाणिस्तान दौऱ्यानंतर भारताने केलेली ही टीका औचित्यपूर्ण ठरत आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील सीमारेषा असणाऱ्या ‘ड्युरांड लाईन’वरील सुरक्षा अत्यंत अपुरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अपुऱ्या सुरक्षेमुळे दहशतवादी सहजतेने एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन हल्ले चढवित असल्याचेही दिसून आले आहे. अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी दहशतवादी असून सर्वाधिक हिस्सा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला.

सुरक्षा परिषदेत दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला लक्ष्य करतानाच भारत अफगाणिस्तानच्या मागे ठामपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील भारतीय दूतांनी दिली. भारत हवाई तसेच सागरी मार्गाने अफगाणिस्तानला आवश्‍यक सहाय्य पुरवित असताना पाकिस्तान मात्र त्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग बंद अडवून धरत असल्याचा आरोपही दूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी केला. अफगाणिस्तानमधील शांतीप्रक्रिया अफगाणींच्या नेतृत्त्वाखाली व नियंत्रणाखाली असायला हवी आणि त्यात देशातील सर्व घटकांच्या आकांक्षांची दखल घेण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

leave a reply