‘डीआरडीओ’कडून ‘एटीजीएम’ आणि ‘अभ्यास’ची यशस्वी चाचणी

अहमदनगर/बालासोर – ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) लेझर गाइडेड रणगाडा भेदी क्षेपणास्त्राची (एटीजीएम) चाचणी घेतली. अर्जुन रणगाड्यावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले आणि त्याने तीन किलोमीटर दूरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. गतिमान लक्ष्यही भेदण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ‘डीआरडीओ’च्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय ‘डीआरडीओ’ने बालासोर येथील तळावर ‘हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट’ची (हिट) यशस्वी चाचणी घेतली.

'एटीजीएम'

भारत आपल्या संरक्षणसज्जतेचे सातत्याने वाढ करत आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांचा धोका ओळखून संरक्षणदलांना आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवून बळकट केले जात आहे. याशिवाय भविष्याचा विचार करून ‘डीआरडीओ’सारख्या संस्था आधुनिक शस्त्रे विकसित करीत आहेत. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या अशाच एका क्षेपणास्त्राची चाचणी मंगळवारी घेण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यातील के. के रेंज या लष्कराच्या तळावर अर्जुन रणगाड्यावरून ”लेझर गाइडेड अँटी टॅंक क्षेपणास्त्रा”ची चाचणी पार पडली आली. डीआरडीओने आपल्या ‘आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’कडून सुरू असलेल्या ‘कॅनॉन लॉन्च मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. सुमारे चार किलोमीटर मारक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र धावत्या लक्ष्याचाही अचूक वेध घेऊ शकते.

विविध प्लॅटफॉर्मवरून डागता येणारे हे क्षेपणास्त्र पाकिस्तान तसेच चीन सीमेवर लक्ष्याचा वेध घेण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकते. या अनुषंगाने हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राद्वारे जमिनीवरून जमिनीवरच्या लक्ष्याचा वेध घेण्यासह कमी उंचीवरुन उडणाऱ्या शत्रूच्या हेलिकॉप्टरचा ही वेध घेतला जाऊ शकतो.

डीआरडीओने घेतलेल्या या यशस्वी चाचणी बद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘डीआरडीओ‘चे अभिनंदन करताना भारताला डीआरडीओचा अभिमान वाटतो असे म्हटले आहे. तसेच विकसित करीत असलेल्या विविध शास्त्रास्त्रांमुळे भविष्यात परदेशी संरक्षण साहित्यावरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्वासही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अर्जुन रणगाड्यावरून ‘लेझर गाइडेड रणगाडा भेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यापूर्वी काही तास आधी ओडिशातील बालासोर येथील डीआरडीओचा तळावर’हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट’ चाचणी घेण्यात आली. हे एक ड्रोन असून याला ‘अभ्यास’ नावानेही ओळखले जाते. ‘अभ्यास’चा उपयोग विविध प्रकारच्या क्षेपणास्त्र चाचण्यासाठी केला जाऊ शकतो. याआधी गेल्यावर्षी मे महिन्यात या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.

leave a reply