भारताकडून ब्राझिलला कोरोना लसीचा पुरवठा

नवी दिल्ली – ब्राझिलने भारतात विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसीची मागणी केली होती. भारताने ब्राझिलला लसीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविल्यावर लगेचच ब्राझिलने या लसींसाठी आपले विशेष भारताकडे रवाना केले आहे. ब्राझिलने ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ दोन्ही भारतीय लसींसाठी करार केला आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाख जणांचा बळी गेला असून अमेरिकेनंतर सर्वाधिक बळी ब्राझिलमध्ये गेले आहेत.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून लस देण्याची मागणी केली होती. भारताने देखील ब्राझिलला लसीचे २० लाख डोस देण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर गुरुवारी लस आयात करण्यासाठी विमान पाठविण्यात आले आहे. लसीचे कन्साईंमेन्ट घेऊन हे विमान शनिवारी पुन्हा ब्राझिलकडे परतेल असे ब्राझिलचे आरोग्यमंत्री एडुआर्डो पोजुएलो म्हणाले. ब्राझिलची राष्ट्रीय आरोग्य संस्था ‘अंविसा’ने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतरच या लसीचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले. या संदर्भात अंविसाची बैठक पार पडणार असून भारत व चीनच्या लसी संदर्भात चर्चाकरून निर्णय घेण्यात येणार आहे.

या बैठकीत चीनच्या लसी संदर्भात चर्चा करण्यात येणार असली तरी ब्राझिलकडून भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला आहे. भारत बायोटेक आणि ब्राझिलच्या प्रीसिसा मेडिकामेंटोमध्ये या संदर्भात करार पार पडला आहे. ब्राझिलमध्ये कोरोनाची लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यासाठी वेळ लागणार आहेत. लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात ब्राझिलने भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांची मागणी केली होती. भारताने पुरवलेल्या औषधामुळे ब्राझिलच्या नागरिकांचे प्राण वाचल्याचे सांगत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी आभार मानले होते. आता पुन्हा ब्राझिलने भारताकडे मदत मागितली आहे.

ब्राझिलसह सुमारे १३ देशांनी भारताकडे कोरोनावरील लसची मागणी केली आहे. देशात १६ जानेवारी रोजी कोरोनावरील लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी जगभराचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतात ही लस प्रभावी ठरल्यास अन्य देशांकडून देखील या लसीची मागणी येऊ शकते.

leave a reply