पोलंडवर कारवाई करून युरोपिय महासंघाला तिसरे महायुद्ध सुरू करायचे आहे – पोलंडचे पंतप्रधान मॅटेस्झ मोराविकी यांचा आरोप

वॉर्सा/ब्रुसेल्स – युरोपिय महासंघ पोलंडच्या डोक्यावर बंदूक ठेऊन मागण्या करीत असून, पोलंडवर कारवाई करून युरोपिय महासंघाला तिसरे महायुद्ध सुरू करायचे आहे, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान मॅटेस्झ मोराविकी यांनी केला आहे. असे झाले तर पोलंड आपल्या हाती असलेल्या सर्व शस्त्रांचा वापर करून बचाव करेल, असा इशाराही त्यांनी दिला. न्यायालयीन यंत्रणा व इतर धोरणात्मक सुधारणांवरून पोलंड आणि युरोपिय महासंघातील तणाव चिघळला असून पंतप्रधान मोराविकी यांनी केलेले वक्तव्य तणाव अधिक तीव्र होण्याचे संकेत देत आहे.

पोलंडवर कारवाई करून युरोपिय महासंघाला तिसरे महायुद्ध सुरू करायचे आहे - पोलंडचे पंतप्रधान मॅटेस्झ मोराविकी यांचा आरोप‘महासंघाच्या नियमांमध्ये न बसणार्‍या न्यायालयीन सुधारणा पोलंडने रद्द केल्या नाहीत तर आर्थिक दंड लादायची धमकी देण्यात आली आहे. युरोपिय महासंघ आमच्या डोक्यावर बंदूक ठेऊन मागण्या करीत आहे. महासंघाला तिसरे महायुद्धच सुरु करायचे असेल तर पोलंड हाती असलेल्या कोणत्याही शस्त्राचा वापर करून आपल्या अधिकारांचे रक्षण करील’, असे वक्तव्य पंतप्रधान मॅटेस्झ मोराविकी यांनी केले. मोराविकी यांच्या वक्तव्यावर पोलंडसह महासंघाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

युद्धाचा उल्लेख करून दडपण टाकण्याच्या प्रयत्नांना महासंघात जागा नाही, असे युरोपियन कमिशनच्या प्रवक्त्यांनी बजावले. युरोपियन संसदेचे सदस्य असणार्‍या मरेक बेल्का यांनी, पोलिश पंतप्रधानांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा दावा केला आहे. युरोपियन कौन्सिलचे माजी प्रमुख डोनाल्ड टस्क यांनी, मोराविकी यांचे वक्तव्य मूर्खपणाचे असल्याची टीका केली आहे.

पोलंडवर कारवाई करून युरोपिय महासंघाला तिसरे महायुद्ध सुरू करायचे आहे - पोलंडचे पंतप्रधान मॅटेस्झ मोराविकी यांचा आरोपपोलंडच्या सत्ताधारी ‘लॉ ऍण्ड जस्टिस पार्टी’कडून राज्यघटना तसेच न्यायालयीन यंत्रणेत अनेक सुधारणा घडविण्यात येत आहेत. त्याचवेळी युरोपिय महासंघाची निर्वासित, प्रसारमाध्यमांचे अधिकार व इतर काही मुद्यावरील धोरणांना पोलंडने विरोध केला आहे. युरोपिय महासंघ पोलंडवर अतिरिक्त अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही सत्ताधारी पक्षाने केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर, पोलंडच्या घटना न्यायालयाने युरोपिय महासंघाच्या करारातील तरतुदी पोलंडच्या कायद्याशी विसंगत असल्याचा निर्णय दिला होता. सदस्य देशाने महासंघाच्या कायदेशीर चौकटीला उघड आव्हान देण्याची ही पहिलीच घटना मानली जाते.

पोलंडने महासंघाला दिलेले आव्हान मोडून काढण्यासाठी त्या देशाला देण्यात येणारा आर्थिक निधी पूर्णपणे रोखून धरावा, असा सल्ला महासंघातील काही सदस्य देश व वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला होता. गेल्या काही दिवसात महासंघाने पोलंडवरील दडपण अधिकाधिक वाढविण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले होते. अशा स्थितीत पोलंडच्या पंतप्रधानांनी केलेले तिसर्‍या महायुद्धाचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply