अफगाणिस्तानातील परिस्थितीचा लाभ घेऊन भारतात दहशतवाद माजविण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – ‘अफगाणिस्तानातील घडामोडी चिंता वाढविणाऱ्या आहेत. या परिस्थितीचा लाभ घेऊन भारतात दहशतवादाला उत्तेजन देण्याचे सीमेपलिकडून होणारे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत. याकडे भारत सरकार अत्यंत सावधपणे पाहत आहे’, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बजावले. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येत असताना, याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर, सलग दोन दिवस संरक्षणमंत्री राजनाथ सिंग इशारे देत आहेत.

पंजाब विद्यापीठाच्या ‘बलरामजी दास टंडन मेमोरियल लेक्चर’च्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी हा इशारा दिला. अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक आहे. पण याचा लाभ घेऊन भारतात दहशतवाद माजविण्याचे सीमेपलिकडून होणारे प्रयत्न हाणून पाडले जातील. याबाबत सरकार अतिशय सावध आहे, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी जनतेला आश्‍वस्त केले. एकाच दिवसापूर्वी तामिळनाडू येथील कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी दहशतवादाचा वापर करण्याचे पाकिस्तानच्या धोरणाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, भारत त्याला सडेतोड उत्तर देईल, असे खडसावले होते.

सलग दुसऱ्या दिवशाही संरक्षणमंत्र्यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीचा लाभ घेऊन भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानला इशारा दिल्याचे दिसत आहे. सध्या तालिबान आपल्याला भारताशी उत्तम संबंध हवे असल्याचे सांगत आहे. त्याचवेळी काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, असे सांगून तालिबानने आपण भारत व पाकिस्तानच्या वादात पडणार नसल्याची जाहीर केले होते. पण तालिबानच्या शब्दांवर विश्‍वास ठेवता येणार नाही, अशी भारताची भूमिका आहे. अद्याप तालिबानबाबत भारताने थेट भूमिका जाहीर केलेली नाही. पण अफगाणिस्तानात लोकशाही व जनतेच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाच्या मार्गाने पुढे जाणारे सरकार अपेक्षित असल्याचे भारताने याआधीच स्पष्ट केले होते.

तालिबानबाबत भारत अतिशय सावध भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत तालिबान आपल्यापासून भारताला धोका नाही, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट करीत आहे. पण आपल्या सुरक्षेच्या बाबतीत भारत कुठल्याही प्रकराची तडजोड करणार नाही, वेळ पडल्यास परदेशात घुसून कारवाई करील, असे भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. भारताने दिलेले हे इशारे तालिबानसह भारतात घातपात माजविण्यासाठी अजूनही टपून बसलेल्या पाकिस्तानसाठी असल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply