अफगाणिस्तानात अमली पदार्थांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी तालिबानच्या हालचाली

- अमेरिकी विश्‍लेषकाचा दावा

अमली पदार्थांच्याकाबुल – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर या देशाच्या अर्थव्यवस्थेची दैना उडालेली आहे. पण तालिबान मात्र अफूची शेती व अमली पदार्थांच्या व्यवसायाला चालना देण्याची तयारी करीत आहे. ९०च्या दशकात तालिबानने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यापार केला होता. आत्ताही तालिबानची या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. अमली पदार्थांमुळे अफगाणिस्तानची आर्थिक व सामाजिक व्यवस्था कोसळली होती, याचीही आठवण विश्‍लेषक करून देत आहेत.

एकीकडे तालिबान आपल्या राजवटीत अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात कठोर कारवाईची घोषणा करीत आहे. तालिबानच्या काही नेत्यांनी अमली पदार्थांचा व्यापार व सेवन खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. पण प्रत्यक्षात तालिबानचा प्रवास वेगळ्या दिशेने सुरू झालेला आहे, असा इशारा अमेरिकी विश्‍लेषक डेव्हिड मॅन्सफिल्ड यांनी दिला.

अफूचा अवैध व्यापार हा अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आणि त्यातील गोंधळाशी गुंतलेला आहे. अफगाणिस्तानातील अफूच्या शेतीवर जगातील हेरॉईनचा व्यापार बर्‍याच प्रमाणात अवलंबून आहे. या अफूबरोबरच अफगाणिस्तानात मेथाम्फेटामाईन अर्थात मेथ या आणखी एका अमली पदार्थाचे उत्पादन केले जाते. या दोन्ही अमली पदार्थांची अमेरिका, लॅटिन अमेरिका व युरोपिय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

या अमली पदार्थांची शेती करणारे अफगाणी तालिबानशी संलग्न असल्याचे वेळोवेळी उघड झाले होते. तालिबान याच मार्गातून सर्वाधिक कमाई करीत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. पण आता मात्र या अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंध नसल्याचे दावे तालिबानने ठोकले आहेत. पण २०२० साली या अमली पदार्थांच्या व्यापारांची तस्करी करणार्‍यांकडून तालिबानने दोन कोटी डॉलर्सची खंडणी वसूल केली होती, असा दावा अमेरिकी विश्‍लेषक मॅन्सफिल्ड यांनी केला.

दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानात हुकूमत असतानाही तालिबानने अमली पदार्थांच्या तस्करीतून मोठा नफा कमावला होता, याचीही आठवण मॅन्सफिल्ड यांनी करुन दिली. पण अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील हल्ल्यानंतर तालिबानच्या जागी सत्तेवर आलेल्या अफगाणिस्तानातील कुठल्याही सरकारने अफूची शेतीवर बंदी टाकण्याची धमक दाखविली नव्हती.

महिन्याभरापूर्वी तालिबानने अफूच्या सेवनावर बंदी टाकण्याची घोषणा केली तरी त्याची अंमलबजावणी करणे तालिबानला शक्य नसल्याचा दावा केला जातो. तालिबानशी संलग्न असणारे अफगाणिस्तानातील काही प्रभावी गट या अमली पदार्थांच्या शेती व व्यापारात गुंतलेले आहेत. त्यांच्यामार्फत तालिबानला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो व गेल्या दोन दशकांपासून तालिबान याच पैशांच्या बळावर अमेरिकेशी लढत असल्याचे दावे केले जात होते.

leave a reply