अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यात सुरक्षादलाचे ३२ जवान ठार

काबूल – तालिबानने एकाच रात्री अफगाणिस्तानच्या दहाहून अधिक ठिकाणी चढविलेल्या हल्ल्यांमध्ये सुरक्षादलाचे ३२ जवान ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारुन तालिबानने या युद्धाच्या मूळ कारणांवर चर्चा झाल्याखेरीज हल्ले थांबणार नसल्याचे तालिबानने घोषित केले आहे. दरम्यान, अफगाण तालिबान पाकिस्तानच्या इशार्‍यावर काम करीत असून अफगाणी लष्करावरील तालिबानच्या हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या हंगामी संरक्षणमंत्र्यांनी केला.

३२ जवान ठार

बुधवारी रात्री तालिबानने अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागात अफगाणी लष्कराच्या सुरक्षा चौक्यांवर हल्ले चढविले. तर काही भागात अफगाणी जवानांबरोबर तालिबानींचा संघर्ष भडकला. यामध्ये अफगाणी सुरक्षादलाचे ३२ जवान ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत. तसेच या संघर्षात तालिबानच्या स्थानिक कमांडरसह २९ दहशतवादी ठार झाले. कतारमध्ये शांतीप्रक्रिया सुरु झाल्यानंतर अफगाणिस्तानात हल्ले कमी केल्याचा दावा तालिबानने केला होता. तालिबानबरोबरील चर्चेला चालना देण्यासाठी अफगाणिस्तानच्या सरकारने तालिबानचे शेकडो दहशतवादी मुक्त केले होते. पण त्यानंतरही तालिबानने अफगाणिस्तानातील लष्करावरील हल्ले सुरू ठेवले आहेत.

३२ जवान ठार

या हल्ल्यांसाठी तालिबानने अफगाण सरकारला जबाबदार धरले आहे. अफगाण सरकारने तालिबानवरील कारवाई सुरू ठेवल्याचा आरोप तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद नईम वरदाक याने केला. दोन दशके सुरु असणारे युद्ध तासाभरातल्या चर्चेने संपणारे नाही. युध्दाच्या कारणांवर चर्चा व्हायला हवी. आज तालिबानने संघर्षबंदी पुकारली आणि चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही तर पुढे काय? असा सवाल करुन तालिबानच्या प्रवक्त्याने अफगाणी लष्करावरील हल्ल्यांचे समर्थन केले. त्याचबरोबर तालिबानला अफगाणिस्तानात इस्लामी राजवट स्थापन करायची असल्याचे या प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे.

तालिबानच्या या आरोपांना अफगाणिस्तानचे हंगामी संरक्षणमंत्री असदुल्लाह खालिद यांनी उत्तर दिले. ‘अफगाणिस्तानच्या सरकारला शांतीचर्चा टिकवायची आहे. पण त्याचबरोबर गेल्या दोन दशकांमध्ये जे काही मिळविले केले आहे, त्याच्याशी तडजोड केली जाणार नाही. अफगाणिस्तानातील महिला आज वैमानिक, डाक्टर, शिक्षिका, नेत्या बनल्या असून त्या स्वातंत्र्याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे यापुढे अफगाणी तरुणी किंवा महिलांना भर चौकात शिक्षा करणे खपवून घेतले जाणार नाही. अफगाणिस्तानचे लष्कर कोणतीही तडजोड करणार नाही’, असे खालिद यांनी स्पष्ट केले. तसेच पाकिस्तान अफगाणिस्तानचे लष्कर कोसळण्याची वाट पहात आहे. पण अफगाणिस्तानातून नाटोने माघार घेतली तरी अफगाणी लष्कर कोसळणार नाही. अफगाणिस्तानचे लष्कर आपल्या भूमीचे रक्षण करण्यास समर्थ आहे, असा विश्वास अफगाणिस्तानच्या हंगामी संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

leave a reply