अल कायदावरील कारवाईसाठी तालिबानने अमेरिकेला दिलेला नकार म्हणजे युद्धाची घोषणाच

- अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम

युद्धाची घोषणाचवॉशिंग्टन – ‘अल कायदाच्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी तालिबानने अमेरिकेला सहाय्य करण्यास नकार दिला आहे. तालिबानचा हा नकार म्हणजे युद्धाची घोषणाच ठरते’, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिला. तर अल कायदाचा प्रमुख अयमन अल जवाहिरी सध्या अफगाणिस्तानात असल्याचा दावा अमेरिकेचे माजी विशेषदूत झल्मे खलिलझाद यांनी केला आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानात हल्ले चढविण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेला आपली हवाई हद्द वापरू देण्याची तयारी केल्याच्याही बातम्या येत आहेत. त्यामुळे लवकरच अफगाणिस्तानात अमेरिकेची ‘ऍक्शन’ दिसेल, असे संकेत मिळत आहेत.

अफगाणिस्तान तालिबानच्या हातात पडल्यानंतर या देशात अल कायदा, आयएस व इतर दहशतवादी संघटनांचा प्रभाव वाढला असल्याचा दावा केला जातो. अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी देखील आघाडीच्या वृत्तवाहिनीशी बोलताना, तालिबान व इतर दहशतवादी संघटनांपासून असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधले.

‘अफगाणिस्तान कोसळत आहे. अल कायदा झपाट्याने वाढत आहे. आयएस अधिकाधिक मजबूत होत चालली आहे. असे असतानाही अमेरिकन्सना ठार करण्याच्या शपथा घेणार्‍या अल कायदाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी तालिबान अमेरिकेला नकार देत आहे. तालिबानची ही कृती म्हणजे अमेरिकेच्या विरोधात युद्धाची घोषणा करण्याइतकेच गंभीर आहे’, असा इशारा ग्रॅहम यांनी दिला.

‘तालिबानचा हा असहकार अफगाणिस्तान हा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका बनला असून वेळीच अफगाणिस्तानात कारवाई केली नाही तर ते पृथ्वीवरील सर्वात मोठे मानवनिर्मित संकट ठरेल’, असे सांगून ग्रॅहम यांनी अफगाणिस्तानात लष्करी कारवाई सुरू करण्याची मागणी केली. सिनेटर ग्रॅहम यांची ही मुलाखत प्रसिद्ध होण्याच्या काही तास आधी अमेरिकेचे अफगाणिस्तानविषयक माजी विशेषदूत झल्मे खलिलझाद यांनी देखील अल कायदाबाबत मोठी माहिती उघड केली.

युद्धाची घोषणाचअल कायदाचा प्रमुख अयमन अल जवाहिरी हा अफगाणिस्तान किंवा शेजारी देशांमध्ये दडलेला असण्याची दाट शक्यता खलिलझाद यांनी वर्तविली. याआधी जवाहिरी जिवंत नसल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरल्या होत्या. पण गेल्याच महिन्यात ९/११च्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अल कायदाने जवाहिरीचा संदेश प्रसिद्ध केला. अशा परिस्थितीत जवाहिरी अफगाणिस्तान किंवा शेजारच्या देशांमध्ये असू शकतो, हा खलिलझाद यांनी केलेला दावा महत्त्वाचा ठरतो.

अल कायदाचा नेता तसेच आयएसच्या दहशतवाद्यांची अफगाणिस्तानातील उपस्थिती इशाराघंटा असल्याचा दावा अमेरिकेतील नेते, लष्करी अधिकारी व विश्‍लेषक करीत आहेत. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर नव्याने हवाई हल्ले चढवावे लागतील, असे अमेरिकन नेते व सामरिक विश्‍लेषक सुचवित आहेत. अल कायदा व आयएस या दहशतवादी संघटनांवरील कारवाईसाठी अमेरिकेला आपल्या हवाईहद्दीचा वापर करू देण्यासाठी पाकिस्तान तयार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात अमेरिका अफगाणिस्तानातील अल कायदा व आयएसच्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करून हल्ले चढविणार असल्याचे समोर येत आहे.

अमेरिकेने असे हल्ले चढविलेच, तर त्याचे फार मोठे परिणाम समोर येऊ शकतील. या हल्ल्यामुळे अमेरिका व तालिबानमध्ये झालेला करार मोडीत निघेल. त्याचवेळी तालिबान अमेरिकेला सहाय्य करणार्‍या पाकिस्तानच्या विरोधात घातपाताचे भयंकर सत्र सुरू करू शकेल. यामुळे ग्रॅहम व खलिलझाद यांनी केलेल्या दाव्यांचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे.

leave a reply